बिहारमध्ये गॅंगवॉर; गोळीबारात चार जणांचा मृत्यू, घटनास्थळावरून मृतदेह बेपत्ता

बिहारची राजधानी पाटणा येथे बुधवारी अवैध वाळू उपसा केल्याच्या कारणावरून रात्री गॅंगवॉर सुरु होते. यावेळी तेथे झालेल्या अंदाधुंद गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र मृतांचे मृतदेह त्या घटनास्थळावरून गायब झाल्याचे वृत्त आहे. अवैध वाळू उपसा सुरु असताना ही घटना घडली. या गोळीबारानंतर बिहटा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत. या घटनेनंतर ठार झालेल्यांचे मृतदेह त्यांच्या ओळखीच्यांनीच नेल्याचेही वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला.

अमानाबाद येथील सोन नदीतून अवैध वाळू उत्खननावरून बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दोन गटात दोन्ही बाजूंनी अचानक गोळीबार सुरू झाला. दोन्ही बाजूंनी रात्री उशिरापर्यंत हा गोळीबार सुरू होता. यावेळी गोळी लागल्याने अनेक जण जखमी देखील झाले आहेत. जखमी लोकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांना घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग सापडले आहेत.