बिहारमध्ये दीड हजार पुरग्रस्त कुटुंबांनी रस्त्याच्या डिव्हायडरवर उभारल्या झोपड्या

35

सामना प्रतिनिधी । मधुबनी/मुजफ्फरपूर

कमला नदीला आलेल्या पुरापासून वाचण्यासाठी सुमारे 1500 कुटुंबांनी राष्ट्रीय महामार्ग एनएच-57 च्या डिव्हायडरवर संसार थाटला आहे. पाच किलोमीटरपर्यंतच्या डिव्हायडरवर झोपड्या बांधून त्यांनी एकप्रकारे नवीन वस्तीच थाटली आहे. पुराच्या प्रलयापासून हे नागरिक वाचले असले तरी एनएच-57 वरून भरधाव गाडय़ांमुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

मुजफ्फरपूर येथे बूढी गंडक नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे नदी किनारा आणि आजूबाजूच्या शहरी भागात, कांटी, मुशहरी आणि बोचहा भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 500 पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिक घरे सोडून पळत आहेत. त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर झोपड्या बांधल्या आहेत. रस्त्याच्या बाजूला थोड्या थोड्या अंतरावर सूचनात्मक फलक लावले पाहिजेत. नॅशनल हायवे केंद्राच्या अख्त्यारीत येतात. त्यामुळे हे काम  केंद्राने केले पाहिजे. आम्ही तिथे कोणतेही फलक लावू शकत नाही, असे आपत्कालीन मंत्री लक्ष्मण राय यांनी सांगितले. पूरग्रस्त महामार्गावर आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला स्टॉपर लावण्याचे निर्देश देण्यात आले होते, मात्र ते अद्याप लावलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी कपिल अशोक यांनी सांगितले.

दहा जणांचा मृत्यू

उत्तर बिहारमध्ये शनिवारी दहा जणांचा बुडून मृत्यू झाला. मुजफ्फरपूर येथे 5, मधुबनीचे 3 आणि दरभंगा-मोतिहारी येथील एक-एक व्यक्तीचा समावेश आहे. तसेच आंघोळीसाठी सीतामढीच्या रुन्नीसैदपूर येथे चार मुली बेपत्ता झाल्या आहेत. प्रशासनाने शेखपूर ढाब आणि अहियापूर भागातून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी चार बोटी तैनात ठेवल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या