माणुसकी हरवली… नातेवाईक आलेच नाहीत, रुग्णवाहिका रुग्णाचा मृतदेह नदीकिनारी सोडून निघून गेली

बिहारमध्ये माणुसकी हरपल्याची एक घटना समोर आली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह नदी शेजारीच सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

बिहारच्या कटिहार येथील ही घटना आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीला रुग्णवाहिका चालक बिहारच्या पूर्णिया रोडच्या भसना पुलाखाली मृतदेह सोडून निघून जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत चोवीस तासात चौकशीचे आदेश दिले आहेत.

चौकशी केली असता हा मृतदेह तिथल्या स्थानिक रहिवाशाचा असून अशोक चौहान असे व्हिडीओतील मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी रात्री या व्यक्तीचे कोरोनाने निधन झाले. मात्र त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणीच मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले नाहीत. रुग्णवाहिका चालक अखेर मृतदेह भसना नदीच्या पुलाखाली सोडून निघून गेले. मात्र मृताच्या नातेवाईकांशी बोलल्यानंतर नेमके प्रकरण समोर येईल, असे समजते आहे.

याप्रकरणी डीएम उदयन मिश्रा यांनी मृताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्राथमिक तपासात मृताच्या नातेवाईकांनी नदीकिनारी मृतदेह पुरण्यासाठी खड्डा करून ठेवला होता अशी माहिती मिळाली. याप्रकरणी रुग्णवाहिका चालकाबरोबरच त्याच्या नातेवाईकांचीही चौकशी करण्यात येणार आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या