ना अॅम्ब्युलन्स आली ना पोलिसांनी मदत केली , मुलाचा छिन्नविछिन्न मृतदेह वडिलांनी गोणीत भरून नेला

बिहार मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. कटिहार जिल्ह्यातील कुर्सेला गावातील एका पित्यावर त्याच्या 14 वर्षाच्या मुलाचा छिन्नविछिन्न मृतदेह गोणीत भरून पोलीस ठाण्यात नेण्याची वेळ आली. काळीज पिळवटून टाकणारे त्या दृष्याचे व्हिडीओ देखील जिल्ह्यात व्हायरल झाले असून सामान्य व्यक्तीसोबत घडलेल्या या भयंकर प्रकाराचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.

लहू यादव असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या 14 वर्षे मुलाचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाला. त्या मुलाचा मृतदेह नदीसोबत वाहून गेला. नदीच्या प्रवाहाने मुलाचा मृतदेह वाहून गेला. लहूने स्थानिकांच्या मदतीने मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह सापडला नाही. काही वेळाने मृतदेह भागलपूर जिल्ह्यातील बटेश्वर स्थानाजवळ दिसल्याचे लहू यादव यांना कळाले. मात्र ते तेथे पोहचे पर्यंत मुलाचा मृतदेह तेथूनही गायब होता. या दरम्यान लहू यादव यांनी पोलिसांना कळवून मुलाचा शोध घेण्याची विनंती केली होती. त्यांनी भागलपूरमधील गोपालपूर व कटिहारमधील कुर्सेला अशा दोन्ही पोलीस ठाण्यात कळवले होते. त्यानंतर त्यांना मुलाचा मृतदेह कटिहार जिल्ह्यातील गंगा किनाऱ्यावर आढळून आला. तिथे पोहचेपर्यंत भटक्या कुत्र्यांनी मुलाच्या मृतदेहाच लचके तोडले होते.

लहू यादव व दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस त्या ठिकाणी पोहोचले होते. मुलाचा मृतदेह इतक्या भयंकर अवस्थेत होता की लहू यादव यांनी तो अंगावरील कपड्यां वरून ओळखला. मुलाला या अवस्थेत पाहून धाय मोकलून रडणाऱ्या लहू यादव यांना पोलिसांनी मृतदेह उचलून पोलीस ठाण्यात घेऊन येण्यास सांगितले. पोलिसांनी ना त्यांना मदत केली ना त्यांच्यासाठी अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करून दिली. लहू यादव स्वत:च्या हाताने मुलाचा मृतदेह उचलत असताना अनेकांना अश्रू अनावर झाले. लहू यादव यांचा मुलाचा मृतदेग गोणीत भरून नेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

आपली प्रतिक्रिया द्या