‘उद्या कंडोम पण मोफत मागाल’; मुलींच्या सॅनिटरी पॅड्सच्या प्रश्नावर महिला अधिकारीच्या उत्तरानं संताप

bihar-officer

बिहारची राजधानी पाटणा येथे मुलींच्या जनजागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्याप्रमाणात मुलींनी सहभाग नोंदवला होता. कार्यशाळेत एका मुलीच्या प्रश्नाला एका वरिष्ठ महिला आयएएस अधिकाऱ्याने दिलेले उत्तर ऐकून सगळेच अवाक् झाले. सरकारला मत द्यायचं नसेल तर देऊ नका, पाकिस्तानात जा, असा अजब सल्लाही त्यांनी दिला. यावरून त्यांच्यावर सडकून टिका होत आहे.

मुलीने विचारले की सरकार 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड देऊ शकत नाही का? मुलीच्या प्रश्नाला उत्तर देताना वरिष्ठ महिला आयएएस अधिकाऱ्याने सांगितले की, या मागणीचा अंत आहे का? त्या पुढे म्हणाल्या की तुम्ही 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड देऊ शकता. तुम्ही उद्या जीन्स-पँट देऊ शकता, परवा शूज का देऊ शकत नाही? आयएएस अधिकारी हरजोत कौर पुढे म्हणाल्या की जेव्हा कुटुंब नियोजनाचा प्रश्न येतो तेव्हा निरोध देखील विनामूल्य द्यावा लागेल.

नवभारत टाइम्सच्या संकेतस्थळाने हे वृत्त आणि त्याचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. मंगळवारी ‘सशक्त बेटी, समृद्ध बिहार: टुवर्ड्स एन्हान्सिंग द वैल्यू ऑफ गर्ल चाइल्ड’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. युनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन आणि प्लॅन इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बाल विकास महामंडळाने ही कार्यशाळा आयोजित केली होती.