नीतीश कुमारांबाबत राबडीदेवी म्हणाल्या… सब माफ है….

बिहारमध्ये राजकीय उलथापालट घडवत नीतीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी आणि इतर सात पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केले आहे. नीतीश कुमार यांनी बुधवारी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

या शपथग्रहण सोहळ्याला तेजस्वी यादव यांचे कुटुंबियही उपस्थित होते. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांना या सात पक्षांच्या युतीबाबत विचारणा करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याबाबत प्रश्न केला असता त्यांनी सब माफ है असे उत्तर दिले. त्यांनी या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. बिहार आणि देशासाठी ही नवीन आणि चांगली सुरुवात असल्याचे त्या म्हणाल्या. 2017 मध्ये नीतीश कुमार यांनी आरजेडीसोबतची युती तोडली होती, त्यावर त्या म्हणाल्या सब माफ है.

2015 मध्ये जेडीयू आणि आरजेडीने एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसही त्यांच्यासोबत होती. या निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी सरकार स्थापन केले होते. तेव्हा नीतीश कुमार मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर जुलै 2017 मध्ये मतभेदांमुळे नीतीश कुमार यांनी आरजेडीसोबतची युती तोडत भाजपसोबत सरकार स्थापन केले होते.

नीतीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडल्यानंतर राबडीदेवी यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी आधीच्या सर्व गोष्टी विसरून पुन्हा एकत्र येण्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले. त्यामुळे सर्व माफ करत पुढे जाण्यासाठी हा मार्ग निवडल्याचे राबडीदेवी यांनी सांगितले.