आरोग्यमंत्र्याच्या असंवेदनशीलतेचा कहर, ‘चमकी’ तापाबाबतच्या बैठकीत विचारला मॅचचा स्कोअर

सामना ऑनलाईन । मुजफ्फरपूर

बिहारमध्ये ‘चमकी’ तापाने थैमान घातलेले असताना या संवेदनशील विषयावरील बैठकीत बिहारच्या आरोग्यमंत्र्याची असंवेदनशीलता दिसून आली. बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी राज्य आरोग्य विभागाच्या महत्वाच्या बैठकीत हिंदुस्थान – पाकिस्तान मॅचचा स्कोअर विचारला. यावेळी त्यांच्यासोबत  केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन तसेच आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे देखील उपस्थित होते. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मंत्री महोदयांच्या वागण्याबाबत नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

बिहारमध्ये ‘चमकी’ तापाने उग्ररूप धारण केले असून, महिनाभरात या तापामुळे जवळपास 100 पेक्षा जास्त मुलांचा बळी गेला आहे. तर जवळपास 290 मुलांवर उपचार सुरू आहेत. याबाबतची गंभीर दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनीही मुजफ्फरपूर येथे भेट देऊन  परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या आरोग्य विभागाच्या महत्वाच्या बैठकीत बिहारचे आरोग्यमंत्री चक्क विश्वचषक क्रिकेट मॅचचा स्कोअर विचारत होते. त्यामुळे बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे हे नागरिकांच्या टीकेचे धनी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या