जलयुक्ताचा तपास लाचलुचपतकडे गेल्यावर कळेल, बिजयकुमार यांच्याकडून नगर कृषी विभागाची झाडाझडती

‘जलयुक्त शिवार’ योजनेची माहिती देण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. कागदपत्रे सापडत नाहीत, चौकशी केली, तर सगळाच अनागोंदी कारभार आहे. आम्ही कुणाला दोषी ठरविण्यासाठी आलेलो नाही. अजूनही तुमचे डोळे उघडणार नसतील, तर हा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्यावर तुम्हाला समजेल, अशा शब्दांत ‘जलयुक्त शिवार’ अभियानाच्या खुल्या चौकशी समितीचे अध्यक्ष बिजयकुमार यांनी नगर जिल्हा कृषी विभागाची झाडाझडती घेतली.

भाजप सरकारच्या काळातील ‘जलयुक्त शिवार’ योजनेतील नगर जिह्यात झालेल्या कामांची चौकशी करण्याकरिता खुली चौकशी समिती आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आली होती. यावेळी चौकशी समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव बिजयकुमार, नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सदस्य संजय बेलसरे (मुख्य सचिव, जलसंपदा), सदस्य सचिव एन. टी. शिसोदे उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीलाच अध्यक्ष बिजयकुमार यांनी ‘जलयुक्त शिवार’ अभियानाच्या कामाची माहिती घेऊन तक्रार अर्ज मागविले. कृषी विभागाकडे तक्रारींची माहिती नसल्यामुळे त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. तक्रारदारांचे अर्ज तुमच्याकडे नसतील तर तुम्ही परस्पर कशी चौकशी केली व कसा अहवाल पाठवला? कामाचे आराखडे व नकाशे दाखवायचे नसतील. तुम्हाला आम्ही सर्व कामे व्हिडीओद्वारे दाखवा, असे सांगितले; परंतु तेही दाखवता येत नाहीत. समितीने आपल्याला माहिती सर्व गोळा करून आम्हाला सादर करा, असे आदेश दिले होते. तरी तुम्ही माहिती घेऊन येत नसाल तर काय उपयोग? तुम्हाला याचे गांभीर्य नसेल. समितीने असा चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठवला व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तुमची चौकशी झाल्यावर तुम्हाला समजेल, असा इशारा बिजयकुमार यांनी दिला.

शासननिर्णयांनुसार कामे झाली आहेत का, तसेच थर्ड पाटी ऑडिट केलेले आहे. त्याचा अहवाल तुमच्याकडे आहे का, अशी विचारणा त्यांनी केली. काहींनी अहवाल दिला आहे; पण ज्यांनी दिला नाही त्यांनी त्याची लेखी कारणे द्यावीत. अधिकारी व कर्मचाऱयांनी गांभीर्याने या विषयाकडे पाहावे. दिरंगाई चालणार नाही, तक्रारदारांच्या तक्रारींचे निरसन झाले की नाही, याची आम्ही खातरजमा करणार असल्याचेही बिजयकुमार म्हणाले.

मैं क्या यहा दहेज लेने आया हूँ!

– ‘तक्रार अर्ज दाखल केला जातो व त्याची प्रत तुमच्याकडे नाही. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही अधिकारी कसले?’ असा सवाल करीत, ‘माहिती पाहिजे ती दिली पाहिजे. मैं क्या यहा दहेज लेने आया हूँ? जो सून कर तुम रुठ जाओगे और बजार जाओगे! ऐसा है क्या…’ असे खडे बोल बिजयकुमार यांनी अधिकाऱयांना भरबैठकीत सुनावले.

शेतकऱयांना योजनेची माहितीच दिली नाही

– चिचोंडी पाटीलचे सुधीर भद्रे यांनी ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या उद्देशाला नगर जिह्याने हरताळ फासल्याचा आरोप समितीसमोर बोलताना केला. कोणत्याही शेतकऱयाला या योजनेची माहिती दिली गेली नाही व त्याच्या सह्यासुद्धा घेतल्या गेल्या नाहीत. परस्पर कामे झाल्याचे त्यांनी दाखवलेले आहे. जो उद्देश सरकारने त्यावेळी या कामांसाठी दिला होता, त्याला हरताळ फासला आहे. यांनी परस्पर रेकॉर्ड बदलले आहे. ई-निविदा ज्यांना द्यायची होती, त्यांना न देता परस्पर दुसऱयाला दिली आहे, अशी लेखी तक्रार मी केलेली आहे, असे भद्रे यांनी सांगून बिजयकुमार यांना त्याची प्रत दिली.

आपली प्रतिक्रिया द्या