दुचाकींची समोरासमोर धडक; दोन युवक ठार तर दोघे अत्यवस्थ

40

सामना प्रतिनिधी । नरसीफाटा (नांदेड)

दोन भरधाव दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे. नरसी जवळील धोकादायक लोहगांव कॉर्नरवर हा भीषण अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव तालुक्यातील धानोरा येथील चंद्रकांत बोडके हे आपले नातेवाईक लक्ष्मण जलदेकर यांच्यासह दुचाकीने बिलोली तालुक्यातील हरनाळी येथे जाण्यासाठी निघाले होते. नरसी पास करुन लोहगांव कॉर्नरवर येताच बिलोलीकडून वेगाने येणारी दुसरी दुचाकी बोडके यांच्या दुचाकीवर आदळली. दोन्ही दुचाकी अति वेगात असल्याने धडक बसताच दोन्ही दुचाकीस्वार लांबवर उडाले. अपघातात चंद्रकांत बोडके यांचा डोक्याला जबर मार लागल्याने अति रक्तस्त्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील बबलू सय्यद याचा नायगाव रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. लक्ष्मण जलदेवार व शकील सय्यद या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्युमूखी पडलेला बबलू सय्यद हा कुटूंबाचा एकमेव आधार होता. सालुरा (तेलंगणा) येथील एका धाब्यावर काम करत होता.

आपली प्रतिक्रिया द्या