8 वर्षांच्या मुलीसोबत केले भयानक कृत्य, मुलीला गॅरेजमध्ये कोंडून आरोपी पळून गेला

खाऊ आणण्यासाठी दुकानात निघालेल्या आठ वर्षीय चिमुरडीला अडवून शंभर रुपये देण्याचे आमिष दाखवित एका दुचाकी कारागिराने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. बिबवेवाडीतील राजीव गांधीनगरात घडलेल्या या प्रकारामध्ये त्याला दोन अल्पवयीन आरोपींनी मदत केली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपीने अल्पवयीन मुलीचा  विनयभंग केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय तरुणाला मदत केल्याप्रकरणी दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे- सरला देसगुडे, पोलीस उपनिरीक्षक, बिबवेवाडी पोलिस ठाणे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिलेची आठ वर्षीय दुकानात खाऊ आणण्यासाठी चालली होती. त्यावेळी राजीव गांधी नगरमध्ये फिर्यादीच्या गल्लीत राहणाऱ्या एका दुचाकी कारागिराने मुलीला  100 रुपये देतो, माझ्या सोबत चल असे म्हटले. त्यानुसार मुलगी त्याच्यासोबत गेली. आरोपीने चिमुरडीला दुचाकी दुरुस्त करायच्या गॅरेजमध्ये नेउन दरवाजा आतून लावून घेतला.

आरोपीने त्याच्या दोन साथीदारांना दाराबाहेर पहारा देण्यासाठी ठेवलं होतं. गॅरेजमध्ये आरोपीने मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपी गॅरेजला बाहेरुन दरवाजाची कडी लावून पळून गेला. इकडे मुलगी बराचवेळ घरी न आल्याने तिच्या आईने तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. आसपासच्या लोकांनीही तिची मदत करायला सुरुवात केली. शोधाशोध सुरू असताना एका व्यक्तीने आतून मुलीचा आवाज येत असल्यासारखे वाटल्याने गॅरेजचे दार उघडले. गॅरेजमधून मुलगी बाहेर आल्यानंतर तिने सगळा प्रकार आईला सांगितला.

 

आपली प्रतिक्रिया द्या