पुण्यात बाईकस्वाराकडून महिलेचा विनयभंग

27

सामना ऑनलाईन,पुणे

पुण्यातील सांगवी भागात एका बाईकस्वाराने महिलेला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. चुकीच्या पद्धतीने बाईक चालवण्याला विरोध केल्यामुळे एका तरुणाने ३७ वर्षीय महिलेवर हल्ला केला. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी बाईकस्वाराविरोधात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनुसार, पीडित महिला ही संध्याकाळच्या सुमाराला आपल्या स्कूटरवरून घरी परतत होती. सांगवीतील पिंपळे-सौदागर इथे स्कूटरवरून जात असताना अचानक एक तरूण बाईकस्वार विरुद्ध दिशेने पीडित महिलेच्या स्कूटरसमोर आला. त्यावेळी महिलेने बाईकस्वाराकडे चुकीच्या पद्धतीने बाईक चालवण्याबद्दल तक्रार केली. त्यावर चिडलेल्या बाईकस्वाराने प्रथम महिलेच्या स्कुटरला धडक देण्याचा प्रयत्न केला. नंतर बाईक आडवी घालून स्कूटर थांबवली. या प्रकारावर चिडलेल्या महिलेने विरोध केला असता संबंधित तरुणाने शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग केला.

या प्रसंगी विनयभंग करताना तरुणाने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी तक्रारीतील वर्णनानुसार आरोपीचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, कालच अशाच एका घटनेत चुकीच्या पद्धतीने बाईक चालवण्याला विरोध केल्याबदद्ल पुण्यामध्येच एका तरुणावर चाकूहल्ला झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या