
रशियाच्या कजान शहरात आयोजित ब्रिक्स परिषदेत हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात तब्बल पाच वर्षांनंतर आज लडाख सीमावाद आणि दहशतवादासह विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय औपचारिक चर्चा झाली. लडाखच्या सीमेवर विविध समस्या मार्गी लावण्यासाठी गस्त घालण्याबाबत दोन्ही देशांमध्ये करार झाल्याच्या दोन दिवसांनंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. सीमेवर शांतता आणि स्थिरता कायम राखण्याला दोन्ही देशांचे प्राधान्य राहिले पाहिजे. परस्पर विश्वास आणि सन्मान तसेच परस्परांबद्दलची संवेदनशीलता दोन्ही देशांमधील सुदृढ संबंधांचा पाया असायला हवा, असे मोदी म्हणाले.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही दोन्ही देशांनी मतभेद योग्य पद्धतीने दूर करायला हवेत. आपले विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी दोन्ही देशांनी परस्पर समन्वय आणि सहकार्य आणखी मजबूत करायला हवे. हिंदुस्थान आणि चीनने दोन्ही देशांमधील संबंध स्थिर राखण्यासाठी एकमेकांसोबत मिळून काम करायला हवे, असेही जिनपिंग म्हणाले. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी एलएसीवरील कराराचे स्वागत केले. दोन्ही देशांमधील विविध मुद्दे निकाली काढण्यासाठी विशेष प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदुस्थानकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनच्या वतीने परराष्ट्र मंत्री वांग यी असतील. दोन्ही नेत्यांमध्ये लवकरच औपचारिक बैठक होईल, अशी माहिती परराष्ट्र सचिवांनी दिली.
दहशतवादावर दुटप्पीपणाला जागा नाही
दहशतवाद आणि दहशतवादी फंडिंगचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. अशा गंभीर विषयावर दुटप्पीपणाला जागा नाही, अशा शब्दांत मोदींनी दहशतवादावर प्रहार केला. आपल्या देशातील तरुणांमध्ये कट्टरतावाद रोखण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. संयुक्त राष्ट्रातील आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील व्यापक अधिवेशनाच्या प्रलंबित मुद्द्यांवर एकत्र काम करावे लागेल. तसेच सायबर सुरक्षा, सुरक्षित आणि सुरक्षित एआयसाठी जागतिक नियमांसाठी काम करायला हवे, असेही मोदी म्हणाले.
आम्ही युद्ध नाही, सुसंवाद आणि मुत्सद्देगिरीचे समर्थक
आम्ही युद्ध नाही तर सुसंवाद आणि मुत्सद्देगिरीचे समर्थन करतो. आम्ही एकत्रितपणे कोविडसारख्या आव्हानाला पराभूत केले. अशावेळी ही बैठक होत आहे. जगभरात अनेक ठिकाणी युद्ध, संघर्ष, आर्थिक अनिश्चितता, हवामान बदल, दहशतवाद अशा घटना घडत असून जगात उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम तोडण्याची चर्चा सुरू आहे. महागाई रोखणे, अन्न सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, जल सुरक्षा हे सर्व देशांसाठी प्राधान्याचे विषय आहेत, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.