बिल गेट्स यांनी केले २९ हजार कोटींचे ‘महादान’

14

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स यांनी जगातील सर्व दानशूर व्यक्तींना मागे टाकत एकाच झटक्यात २९ हजार ५७१ कोटी रुपयांचे महादान केले आहे. गेट्स यांनी त्यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे ६ कोटी ४० लाख शेअर दान केले आहेत. ज्यांची किंमत ४.६ बिलियन डॉलर म्हणजेच २९ हजार ५७१ कोटी रुपये आहे. गेट्स यांनी केलेले हे २१व्या शतकातले सर्वात मोठे दान आहे. सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनने प्रसिध्द केलेल्या पत्रकात ही महिती देण्यात आली आहे. मात्र हे ‘महादान’ कोणाला करण्यात आले हे सांगण्यात आलेले नाही.

बिल गेट्स साधारणपणे बिल अँड मेलिंडा फाऊंडेशन या त्यांच्याच संस्थेला दान देतात. या संस्थेतर्फे गेट्स व त्यांची पत्नी जगभरात विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबवत असतात. यामुळे त्यांनी हे महादान त्यांच्याच संस्थेला केले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

‘ब्लूमबर्ग’ने प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार ६१ वर्षीय गेट्स यांनी १९९९ साली १६ बिलियन डॉलरचे शेअर दान केले होते. त्यानंतर वर्षभरानंतर त्यांनी ५.१ बिलियन डॉलर्सचे शेअर दान केले होते. त्याआधी १९९४ साली बिल व मेलिंडाने ३५ बिलियन डॉलरचे शेअर व रोख रक्कम दान केली होती. एवढी मोठी रक्कम दान केल्यानंतरही बिल गेट्स यांचे नाव जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत कायम आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या अब्जाधीशांच्या यादीतही गेट्स यांची संपत्ती ८६.१ बिलियन डॉलर एवढी दाखवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या