आगामी दशकात हिंदुस्थान आर्थिक झेप घेणार – बिल गेटस्

544

आगामी दशकात हिंदुस्थानचा आर्थिक विकास झपाट्याने होणार असल्याचा विश्वास जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या बिल गेटस् यांनी व्यक्त केला आहे. हिंदुस्थानातील अनेकजण गरीबीतून बाहेर पडून मोठी आर्थिक झेप घेतील असे ते म्हणाले. आपण भविष्य जाणात नाही. मात्र, आगामी दशक हिंदुस्थानचेच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हिंदुस्थानकडे विकासाच्या प्रचंड संधी आणि क्षमता असल्याचे ते म्हणाले. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या कामाची पाहणी करण्यासाठी ते सध्या हिंदुस्थान दौऱ्यावर आहेत.

आर्थिक विकास झपाट्याने करण्याची क्षमता हिंदुस्थानकडे आहे. त्यामुळे या दशकात हिंदुस्थानातील गरीबी कमी होणार आहे. आरोग्य आणि शिक्षणात गुंतवणूक करुन देशाचा विकास होणार आहे. सध्या देशावर मंदीचे सावट असताना बिल गेटस् यांचे भाकीत दिलासा देणारे आहे. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था वेगाने विकास करत आहे.  देशातील आधार प्रणाली, आर्थिक सेवा तसेच फार्मा क्षेत्राचेही गेट्स यांनी यावेळी कौतुक केले. आधार आणि युपीआयच्या माध्यमातून विविध सेवा पुरवल्या जात आहेत. इतर देशांनाही याचा आदर्श घेता येईल असे ते म्हणाले.

बिल गेट्स यांनी नुकतेच जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीचे स्थान पुन्हा पटकावले आहे. त्यांनी अॅमेझॉनच्या जेफ बेजोस यांना मागे टाकले आहे. त्यांची एकूण संपत्ती 110 बिलिअन डॉलरवर पोहोचली आहे. गेट्स यांनी अनेक देशांतील गरीबी कमी करण्यासाठी आणि सामाजिक विकासाच्या कार्यासाठी  बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला 35 बिलिअन डॉलरपेक्षा अधिक संपत्ती दान केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या