लष्करप्रमुख बिपीन रावत बनले तिन्ही सेनादलांच्या चिफ ऑफ स्टाफ समितीचे अध्यक्ष

802
bipin-rawat

हिंदुस्थानी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज तिन्ही सेनादलांच्या चीफ ऑफ स्टाफ समितीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.रावत यांनी मावळते अध्यक्ष हवाईदल प्रमुख बी एस धानोआ यांच्याकडून या पदाची सूत्रे स्वीकारली.

संरक्षण मंत्रालयाने लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांतील जवानांत एकोप्याची भावना वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने आणि या दलांच्या सामर्थ्यात मोठी वाढ व्हावी या उद्देशाने चिफ ऑफ आर्मी स्टाफ समिती अध्यक्षपद निर्माण केले आहे. एअर चीफ मार्शल धानोआ यांनी तत्कालीन नौदलप्रमुख सुनील लांबा यांच्याकडून यंदा २९ मे रोजी या पदाची जबाबदारी स्वीकारली होती. धानोआ हे सोमवारी ३० सप्टेंबरला निवृत्त होत आहेत .त्यांच्याकडून चीफ ऑफ स्टाफच्या अध्यक्षपदाचे बेटन आज लष्करप्रमुख रावत यांनी स्वीकारले.

देशाच्या सेनादलांत नवचैतन्य आणणार – रावत
हिंदुस्थानची तिन्ही संरक्षण दले देशाबाहेरील आणि देशातील संकटांना सामोरे जायला सज्ज आहेत. भविष्यात आपल्या सेना दलांना हायटेक युद्धांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे तिन्ही दलांत समन्वय आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत करण्याला आणि या दलांचे आधुनिकीकरण करण्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. माझ्यावर सरकारने टाकलेली मोठी जबाबदारी पार पाडताना सेनादलाचे मनोबल सतत वाढते कसे राहील याकडे माझे विशेष लक्ष असेल,अशी प्रतिक्रिया लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी चीफ ऑफ स्टाफ समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर बोलताना व्यक्त केली

आपली प्रतिक्रिया द्या