बर्ड फ्लूची दहशत; कानपूर प्राणी संग्रहालयात पक्ष्यांना मारण्याचे आदेश

उत्तर प्रदेशात बर्ड फ्लूच्या फैलावाचा धोका आहे. लखनऊच्या पक्षी संग्रहालयातील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा व्हायरस आढळल्यानंतर येथील पक्षी संग्रहालय विभाग बंद करण्यात आला आहे. या विभागात जाण्यास लोकांना मनाई करण्यात आली आहे. तर कानपूरच्या प्राणी संग्रहालयातील पक्ष्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येथील काही पक्ष्यांमध्येही बर्ड फ्लूचे व्हायरस आढळले आहेत. तसेच कानपूर संग्रहालय सील करण्यात आले आहे.

कानपूरच्या प्राणी संग्रहालयातील चार पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांची तपासणी केली असता त्यांच्यात बर्ड फ्लूचे व्हायरस आढळले आहेत. त्यामुळे कानपूरचे आयुक्त राजशेखर यांनी संग्रहालयाजवळचा परिसर रेडझोन घोषित केला आहे. तसेच प्रशासन आणि परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच संग्रहालयाच्या पक्षी विभागातील पक्ष्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या संग्रहालयात दोन दिवसात 10 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील चार पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचे व्हायरस आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच सुरक्षिततेसाठी लखनऊ प्राणीसंग्रहालयातील पक्षी विभाग बंद करण्यात आला आहे. या विभागात जाण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. हा पूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. तसेच परिसराचे सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.

प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना चिकन देणे बंद करण्यात आले आहे. आता जनावरांना 20 मिनिटे उकळून अंडे देण्यात येत आहे. तसेच बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी पक्ष्यांना औषधेही देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील दोन प्राणी संग्रहालयातील पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे दिसून आल्यानंतर उत्तर प्रदेशात बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या