नांदूरमध्यमेश्वरला पाच हजार पक्ष्यांचा किलबिलाट, ‘बर्ड समर सफारी’त रशियन पर्यटक

5

सामना ऑनलाईन, नाशिक

महाराष्ट्रातील भरतपूर समजले जाणारे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य ऐन उन्हाळ्यातही तब्बल पाच हजार पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेले आहे. नेचर क्लब ऑफ नाशिक संस्थेतर्फे आयोजित बर्ड समर सफारी या उपक्रमांतर्गत पक्षीनिरीक्षण सहलीत रशियन पर्यटकांनी सहभाग घेत पक्षीनिरीक्षणाचा आनंद लुटला. पहिल्याच वर्षी पक्षीप्रेमींचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

नेचर क्लब ऑफ नाशिक या संस्थेने यंदा प्रथमच निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पक्षीनिरीक्षण सहलीचे आयोजन केले होते. सध्या निफाड परिसरात चाळीस अंश सेल्सिअसच्या घरात कमाल तापमान आहे, असे असतानाही येथे तब्बल पाच हजार पक्षी बघावयास मिळत आहेत. धरणातील पाणीसाठा संपत आला असतानाही यावर्षी खाद्य शोधण्यासाठी मोठ्या संख्येने पक्षी येथे आले आहेत. त्यात पेंटेड स्टोर्क, उघड्या चोचीचा करकोचा, शराटी, शावलर, विजन, गडवाल, जाकाना, गारगर्नी, ब्राह्मणी डक, ग्रे हेरॉन यांचा समावेश आहे.

या उपक्रमांतर्गत भरउन्हात पक्षीनिरीक्षण करतांना उपस्थितांना अनेक पक्षी जवळून बघायला मिळाले. धरणात पाणी नसल्याने थेट आत चालत जाऊन पक्षीनिरीक्षण करण्याची संधी मिळाल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त केला. नाशिकमध्ये दाखल झालेल्या सर्कसमधील रशियन कलावंतांनी या सहलीत सहभाग नोंदवत पक्षी निरीक्षण केले. त्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांच्यासह अभयारण्याचे गाईड अमोल जाधव, गंगाधर आढाव, प्रमोद दराडे, अमोल डोंगरे आदींनी माहिती दिली. यावेळी सागर बनकर, आकाश जाधव, आशीष बनकर, अभिषेक रहाळकर, धनंजय बाग यांसह निसर्गप्रेमी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या