पक्ष्यांच्या घरात…

441

विद्या कुलकर्णी, पक्षीनिरीक्षक

किलबिल करणारे पक्षी… सगळ्यांना हवेहवेसे… मध्यंतरी ठाण्यात एक जाहिरात पाहिली. जाहिरात टोलेजंग, अनेक मजली टॉवरची होती. आजूबाजूची शांतता, सुसज्ज सोयीसुविधा आदी सवलतींची त्यात जंत्री होती. या सगळ्या भाऊगर्दीत वुई आर हॅविंग नॉईसी नेबर फॉर यू आणि बाजूला किलबिलणाऱया पक्ष्यांचे सुंदर चित्र. म्हणजे अगदी आलिशान तथाकथित आधुनिक, उच्चभ्रू वस्तीतदेखील हे शेजारी हवेहवेसे असतात. अगदी जवळून या चिमुकल्यांना पाहायचे असेल तर आपल्यालाच त्यांच्या घरात जावे लागते. त्यांचं घर अर्थात खास पक्ष्यांचे अभयारण्य…

महाराष्ट्रामध्ये पक्ष्यांची अभयारण्ये मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, बारामती वगैरे ठिकाणी आहेत. अगदी वर्षभर तिथे पक्ष्यांचे वास्तव्य असते. भिगवण बारामती, टिकूजीनी वाडी ठाणे, भांडुप पम्पिंग स्टेशन, भोपर ठाणे, पाडळे व्हिलेज, तानसा ट्रेल, कर्नाळा पनवेल, येऊर ठाणे, बाणेर, पुणे, नांदुरमधमेश्वर अशी काही निवडक अभयारण्याची नावे आहेत. अभयारण्यामध्ये काही पक्षी ऋतूप्रमाणे येतात. सुगरणसारखे पक्षी पावसाळ्यामध्ये घरटी बांधायला येतात तर रोहित पक्षी हिवाळ्यामध्ये आपल्याकडे थंडी कमी असते म्हणून थंड प्रदेशातून चार महिने येतात.

हिंदुस्थान सरकारने जी अभयारण्ये संरक्षित विभाग म्हणून घोषित केली आहेत, तेथील वातावरण हे पक्षीसंवर्धनाच्या दृष्टीने अनुकूल असते. सरकारी यंत्रणेद्वारे त्या भागांचे अतिशय काटेकोर पद्धतीने संवर्धन केले जाते. पाणथळ जागा असेल तर त्याची स्वच्छता राखली जाते, जंगलामध्ये योग्य प्रकारची वृक्ष लागवड केली जाते.

मुंबईमधील अभयारण्येभांडुप पम्पिंग स्टेशन बऱयाच कारणामुळे पक्ष्यांसाठी माहेरघर आहे. इथे सांडपाण्यावर प्रक्रिया होते. परत आजूबाजूला असलेले पाणी क्रीक, मॅनग्रोज व मडफ्लॅट्समुळे खूपच पक्षी इथे वास्तव्य करतात. आता तर बोटीने तासाभराची सफर करून रोहित, घार, कोतवाल, शेकाटय़ा, बगळा, सॉचिकली, वेडा राघू, ढोकरी वगैरे बऱयाच पक्ष्यांचे दर्शन होते.

शिवडी मडफ्लॅट्स, संजय गांधी नॅशनल पार्क, आरे कॉलनी, तुंगारेश्वर बऱयाच पक्ष्यांचे माहेरघर आहे. इथे झाडी भरपूर आहे. काही ठिकाणी पाणथळ जागा आहे. त्यामुळे बरेच पक्षी बघायला मिळतात.

कर्नाळा पक्षी अभयारण्यमुंबईपासून ६० कि.मी.वर माथेरान-कर्जतजवळ कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. याचे क्षेत्रफळ जरी फक्त ४.२७ कि.मी. असले तरी पक्षी खूपच बघायला मिळतात. कर्नाळा किल्ला व छोटय़ा छोटय़ा टेकडय़ा व खूप दाट झाडी असल्यामुळे पक्ष्यांचे निवासस्थान आहे.

भिगवण अभयारण्यअतिशय छोटेसे डस्टी गाव आहे. पुणे-सोलापूर हायवेवर पुण्यापासून १०५ कि.मी. अंतरावर आहे. उजनी धरणाच्या बॅकवॉटरवर पाणपक्षी बऱयाच संख्येने आढळतात. शेकाटय़ा, मळगुजा, कमल्पनी, गायबगळा, काम, कुरल, बगळा, वेडा राघू, केंटिश चिखली, पाणकोंबडी, पाणमोर, चक्रवाक, बदक, बऱयाच संख्येने रोहित वगैरे.

नांदुरमधमेश्वर अभयारण्यहे नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये नांदुरमधमेश्वर डॅम, जिथे गोदावरी व कडवा नद्या मिळतात तिथे आहे. हे अभयारण्य फोटोग्राफर्सचे अतिशय आवडते ठिकाण आहे. येथे सुरेख पंखांचे पाणपक्षी बऱयाच संख्येने बघायला मिळतात. पानवेली, मोठेमोठे वृक्ष या तळय़ाच्या सभोवताली आढळतात. त्यामुळे हा परिसर अतिशय रम्य दिसतो. येथे २२० पक्ष्यांचे प्रकार, ४०० वृक्षांचे प्रकार, २४ प्रकारचे मासे व छोटे मॅमल्स इतका प्रचंड खजिना आढळतो.

मयानी अभयारण्यसाताऱयाजवळ अतिशय मोठे असे हे जगप्रसिद्ध अभयारण्य आहे. इथे सायबेरियामधून रोहित पक्षी मोठय़ा संख्येने येतात. अतिशय महत्त्वाचे अभयारण्य आहे. महाराष्ट्रात बघायला मिळणाऱया काही पक्ष्यांची नावे अशी आहेत. मुग्ध बलाक, उचाटय़ा, थापटय़ा, पट्टकादंब, राखी बगळा, कुदळ्या, नीलिमा, चश्मेवाला, कुरटूक, कवडय़ा, धनेश, नीलमणी, निळ्या डोक्याचा कस्तूर, शमा, दयाळ, काळ्या डोक्याचा खंडय़ा, शाही बुलबुल, कुरारी, राखी झोळीवाला, कापशी घार, कवडय़ा खंडय़ा, रोहित, लाल गाल्या बुलबुल, लाल कल्ल्याचा बुलबुल, पीत वटवटय़ा, लाल मुनिया, हळद्या, मिटू पोपट, रंगीत करकोचा, पट्टकादंब, वटवटय़ा, लाल बुदडय़ा बुलबुल, घार, रात बगळा, कोक्कोक, डोंबारी, राखी वटवटय़ा, कोकिळा, स्वर्गीय नर्तक, खाटीक, कोतवाल, शेकाटय़ा, मळगुजा, बहिरी ससाणा, ब्राह्मणी मैना, कमलपक्षी, गायबगळा, हुदहुद, मोर, शिंपी, भारद्वाज, बगळा, वेडा राघू, धनेश, ढोकरी, रानभाई होला, पाणकोंबडी, श्वेतकंठी कस्तूर, टिटवी, चन्ना पोपट, चक्रवाक, खंडय़ा, पाणभिंगरी, बदक, पिंगळा, चष्मेवाला, माळटिटवी, पाणकावळा, नीलांग, सुगरण इत्यादी.

शिस्तीने वागा…!

  • रंगीबेरंगी भडक कपडे घालू नयेत, साधारण आपले सैनिक ज्या प्रकारे पेहराव करतात त्याचेच अनुकरण करावे, म्हणजे आपल्याला बघून पक्षी उडून जात नाहीत.
  • खाण्याचे पदार्थ बरोबर घेऊन जाऊ नये. पक्ष्यांना काहीही पदार्थ खायला देऊ नयेत. आजूबाजूला कुठल्याही प्रकारचा कचरा करू नये.
  • अभयारण्यात जाताना आवाज न होणारी पादत्राणे घालावीत. पक्ष्याच्या जवळ जाऊ नये.
  • निरीक्षण करताना जवळ दुर्बीण ठेवावी व त्याचा वापर करावा, म्हणजे लांबूनच पक्षी न्याहाळता येऊ शकतात.
  • फोटो काढताना फोकल अंतर जास्त असणाऱया भिंगाने काढावेत, म्हणून पक्ष्याच्या फार जवळ जावे लागत नाही.
  • अभयारण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज करू नये. त्यामुळे पक्षी घाबरतात व लगेच उडून जातात.
  • कुठल्याही प्रकारचे वाहन नेऊ नये. फक्त हळूहळू पावले टाकत चालावे. म्हणजे पक्षी घाबरत नाहीत.
  • आपण पक्ष्याच्या दृष्टिक्षेपात येणार नाही याची खबरदारी घ्यावी, पक्ष्याच्या मागील बाजूने किंवा कडेकडेने चोरपावलाने जावे.
  • पक्ष्यांचा प्रथम आवाज किंवा किलबिल ऐकू येते. त्यानंतर मात्र अतिशय सावधतेने पुढे जावे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या