बेटी बचाओ बेटी पढाओ.., लाडकी बहीण.. अशा एक ना अनेक योजना सरकार जाहीर करत असते. मात्र गेल्या दहा वर्षांत सरकार महागाईचा वाढता आलेख रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याने याचा अप्रत्यक्ष फटका मुलींच्या जन्मदरावर झाला आहे. वाढत्या महागाईच्या वरवंट्याखाली सर्वसामान्य जनता चिरडू लागल्याने ‘हम दो.. हमारे दो..’ असे म्हणण्याची भीती मध्यमवर्गीयांना वाटू लागली असून फॅमिली प्लॅनिंग वाढले आहे. यामुळे ठाण्यात मुलींचा जन्मदर घटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी सरकारी तसेच सामाजिक पातळीवर जनजागृती केली जाते. मात्र त्यानंतरही मुलींचा जन्मदर घटल्याचे ठाणे महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातून मिळालेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या निरीक्षणानुसार वाढती महागाईदेखील याला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ‘हम दो.. हमारे दो..’ ही मोहीम राबवण्यात आली होती. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला.
कुटुंब व्यवस्थेला धोका
2024 मध्येही एक हजार मुलांमागे अवघ्या 933 मुली जन्मल्याची नोंद ठाणे महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडे आहे. 2020 मध्ये एक हजार मुलांमागे 936 मुली जन्मल्या. 2021 मध्ये 924, 2022 मध्ये 930, 2023 मध्ये 932 तर 2024 ऑगस्ट महिन्यापर्यंत 1 हजार मुलांच्या तुलनेत 933 मुली जन्मल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. या अनुषंगाने मुलींचा जन्मदर घटता राहिल्याने अनेक विवाहेच्छुकांना वधू मिळण्यात अडचणी निर्माण होऊन कुटुंब व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे.
दृष्टिकोन बदलणे गरजेचे
मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत असल्याने मोठी चिंतेची बाब आहे. एकविसाव्या शतकात वंशाचा दिवा मुलगाच असल्याची भावना अजून काहींच्या मनात आहे. तसेच विविध सामाजिक प्रश्नांमुळे मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्याने प्रामुख्याने मुलींची संख्या घटण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.
– वाढती महागाई, बदललेली लाईफ स्टाईल, विभक्त कुटुंब पद्धती यांमुळे कुटुंब नियोजनाकडे कल वाढला आहे.
– मुलगा हाच वंशाचा दिवा मानत असल्याने बेकायदा गर्भनिदान चाचण्या करून ‘नकोशी’ला पहिला श्वास घेण्याअगोदरच तिचा गळा घोटतात. अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. परंतु याचा फटका आता मुलींचा जन्मदर घटण्यावर झाला आहे.