
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या गोंडपिपरी शहरातील भाजपाचा कार्यकर्त्याला पोलिसांनी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वीच या नेत्याने जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. खेमचंद गरपल्लीवार असं या नेत्याचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी येथील खेमचंद गरपल्लिवार यांनी राज्याचे अमृता फडणवीस यांच्यावर समाजमाध्यमात आक्षेपार्ह लिखाण केलं होतं. या लिखाणानं भाजप कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी गरपल्लिवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यापूर्वीही गरपल्लिवार यांच्यावर गुन्हे दाखल होते. त्यामुळे गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू यांनी गरपल्लिवार यांच्यावर उपविभागिय पोलीस अधिकारी, उपविभाग यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 ( 1 ) ( अ ) ( ब ) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव उपविभागिय अधिकारी गोंडपिपरी यांच्याकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावावर उपविभागिय अधिकारी यांनी जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश पारित केला आहे.