स्थायी समितीवरील आरोपाचा ‘ड्रामा’ भाजपच्या अंगलट! गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 कोटी कमी निधी

bmc

स्थायी समितीकडून पक्षाला मिळणाऱया विकासकामांच्या निधीवाटपावरून शिवसेनेवर नाहक आरोप करण्याचा भाजपचा ‘ड्रामा’ त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाजपला यावर्षी तब्बल 30 कोटी कमी मिळाले आहेत. भाजपकडून स्थायी समिती अध्यक्षांवर केलेल्या आरोपांनंतर निर्माण झालेल्या वातावरणामुळेच प्रशासनाने आश्वासन दिलेल्या निधीपैकी 325 कोटी कमी दिल्याचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. यावर्षी अर्थसंकल्पातून स्थायी समितीला 650 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

मुंबईतील विकासकामांसाठी अर्थसंकल्पातून दरवर्षी स्थायी समितीला ठरावीक निधी दिला जातो. यानुसार गेल्या वर्षी 750 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. यानुसार गेल्या वर्षी शिवसेनेला 232 कोटी, भाजपला 90 कोटी, काँग्रेसला 70 कोटी, राष्ट्रवादीला 20 कोटी, समाजवादीला 18 कोटी निधी देण्यात आला होता. मात्र यावर्षी जादा निधी द्यावा अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली होती. यानुसार गटनेत्यांच्या बैठकीत आयुक्तांनी मान्यता देत एक हजार कोटींवर निधी देण्याचे मान्य केले होते. दरम्यानच्या काळात भाजपने शिवसेनेला बदनाम करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आरोप केले. यामुळे गेल्या वर्षीचे 350 कोटीदेखील आयुक्तांनी रखडून ठेवले. मात्र यशवंत जाधव यांनी पाठपुरावा केल्यानंतर हा निधी तातडीने देण्यात आला. मात्र मधल्या काळात भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांमुळे पालिका प्रशासनाने मान्य केलेल्या एक हजार कोटींच्या निधीत मोठी कपात करून 650 कोटींचा निधी दिला.

या वर्षी असे झाले निधी वाटप

यावर्षी स्थायी समितीला मिळालेल्या 650 कोटींमधील 97 नगरसेवक असलेल्या शिवसेनेला 230 कोटी, 83 नगरसेवक असलेल्या भाजपला 60 कोटी, 29 नगरसेवक असलेल्या काँग्रेसला 81 कोटी, 8 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला 21 कोटी, 6 नगरसेवक असलेल्या समाजवादी पक्षाला 18 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. या वर्षी भाजपने केवळ राजकारणासाठी केलेल्या आरोपांमुळेच निधीला कात्री लागल्याने सर्वच पक्षांचा निधी कमी झाल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या