भाजपने स्थायीच्या ५ नगरसेवकांचे राजीनामे घेतले

19

सामना प्रतिनिधी । पुणे

पिंपरी-चिंचवड पालिकेतील सत्ताधारी भाजपने पाच वर्षांत ५५ नगरसेवकांना स्थायी समितीत संधी देण्याचे निश्चित केले आहे. चिठ्ठीद्वारे भाजपचे सहा नगरसेवक स्थायी समितीतून बाहेर पडल्यावर ‘बचावलेल्या’ चार आणि एका अपक्ष नगरसेवकाचा राजीनामा भाजप नेतृत्वाने शुक्रवारी (दि. ९) घेतला. तर महापौर नितीन काळजे यांनी तातडीने हे राजीनामे मंजूर केले. नव्या ५ सदस्यांची नियुक्ती २० मार्चच्या महासभेत केली जाणार आहे.

स्थायी समितीत भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. त्यांची नावे चिठ्ठीद्वारे निश्चित केली जातात. चिठ्ठीतून नावे काढण्यापूर्वी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपच्या दहा आणि अपक्ष एक अशा ११ नगरसेवकांचे स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामे घेतले. स्थायी समितीत पाच वर्षांत ५५ नगरसेवकांना संधी देण्यासाठी राजीनामे घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्थायी समिती सभापती सीमा सावळे, आशा शेंडगे, कुंदन गायकवाड, उषा मुंडे, कोमल मेवानी, हर्षल ढोरे हे भाजपचे सहा सदस्य चिठ्ठीद्वारे बाहेर पडले. त्यानंतर, या सदस्यांच्या जागेवर नव्याने नियुक्ती करण्यात आली. तर, भाजपचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी आणि निर्मला कुटे, तसेच अपक्ष कैलास बारणे हे स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून कायम राहिले होते. स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला अडचण येऊ नये यासाठी भाजपने चिठ्ठीतून बचाविलेल्या स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे मंजूर केले नव्हते. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यावर भाजप नेतृत्वाने शुक्रवारी राजीनामे मंजूर करण्यास ‘हिरवा कंदील’ दाखविला. त्यानुसार, महापौर काळजे यांनी राजीनामे मंजूर केल्याचे लेखी पत्र नगरसचिव विभागाला दिले. आता स्थायी समितीत भाजपच्या चार आणि अपक्षांची एक जागा रिक्त झाली आहे. रिक्त जागांवर नवीन सदस्यांची मार्च महिन्याच्या महासभेत नियुक्ती केली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या