पराभवानंतर भाजप नेत्याची उप-विभागीय दंडाधिकाऱ्याला मारहाण

सामना ऑनलाईन । बरेली

उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली असताना एका उमेदवाराचा पराभव झाल्याने बरेली भाजप अध्यक्षांनी राडा केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये राठोड निकालामध्ये गडबड झाल्याचा आरोप करत उप-विभागीय दंडाधिकाऱ्यांना पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी करताना दिसत आहेत. मात्र त्यांनी नकार देत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला विजयी घोषित केल्याने भाजप नेत्याने त्यांना पोलिसांसमोर धक्काबुक्की केली.

बरेली भाजप अध्यक्ष रवींद्र राठोड यांची मेव्हणी प्रेमलता यांचा बरेलीमध्ये बसपा उमेदवार शहला ताहिर यांनी १७१ मतांनी पराभव केला. पराभव सहन न झाल्यामुळे चिडलेल्या रवींद्र सिंह राठोड यांनी उप-विभागीय दंडाधिकाऱ्यावर हात उचलला. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत मारहाण केली. याप्रकरणी बरेली भाजप अध्यक्ष आणि त्यांचा भाऊ नरेंद्र राठोड  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही गायब झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या निकालानंतर रवींद्र राठोड यांचे भाऊ नरेंद्र यांनी पुन्हा एकदा मतमोजणी करण्याची मागणी केली. मात्र उप-विभागीय दंडाधिकारी राजेश कुमार यांनी ही मागणी फेटाळून लावत निकालाचे स्वागत करण्याचे आवाहन केले. मात्र यामुळे चिडलेल्या भाजप नेत्याने राजेश कुमार यांनी मारहाण केली. पोलिसांनी मध्यस्थी करत सर्व प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने वातावरण काही काळ गरम झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या