नागपूर महापालिकेत नियुक्ती घोटाळा, भाजपच्या महिला उमेदवाराचा पती निलंबीत

86

सामना ऑनलाईन । नागपूर

नागपूर महानगरपालिकेत सफाई कामगारांच्या वारसांना नोकऱ्या दिल्या जातात. मात्र अनेकांनी बोगस कागदपत्रे सादर करून नोकऱ्या लाटल्या असून या नियुक्त्यांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. अनेकजण पालिकेत नोकरी करीत नसतानाही पगार लाटत आहे. या प्रकरणात यापूर्वी दोघांचे निलंबन करण्यात आले होते. आता भाजपाच्या प्रभाग २९ मधील उमेदवार लीला हाथीबेड यांच्या पतीसह आणखी एकाचे निलंबन करण्यात आले असून स्थापना विभागाने याबाबातचे आदेश जारी केले आहे़त.

लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसदारांना महापालिकेत नोकरी देण्याची तरतूद आहे़  ज्यामध्ये सफाई कामगारांचा मृत्यू झाल्यास, सेवानिवृत्त वा स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास संबधित कर्मचाऱ्याच्या वारसाला नोकरी दिली जाते़  मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने एका व्यक्तीची नोकरी दोन व्यक्तींना देण्याचा प्रताप महापालिकेत करण्यात आला़ वारसदार नसतानाही अनेकांनी बोगस नोकऱ्या बळकावल्या.

महाराष्ट्र प्रदेश सफाई कामगार महासंघाचे संयोजक किशोर समुंद्रे यांनी लाड पागे समितीच्या तरतुदीनुसार करण्यात आलेल्या नियुक्त्यांमधील बोगस कारभार चव्हाट्यावर आणला होता. कागदपत्रांनिशी त्यांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनात खळबळ माजली. कुणीकुणी बोगस नोकऱ्या लाटल्या याची माहिती त्यांनी कागदपत्रांनिशी दिल्यामुळे चौकशी सुरू झाली. या प्रकरणात आरोग्य निरीक्षक तांबे याला निलंबित करण्यात आले. नंतर राजेश खोटे नामक एका कर्मचाऱ्याचे प्रकरण पुढे आले आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी हा कर्मचारी काम करीत असल्याची लेखी तक्रार महासंघातर्फे करण्यात आली होती़

लीला हाथीबेड प्रभाग २९ मधील उमेदवार

भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग २९- अ मधील उमदेवार असणाऱ्या लीला हाथीबेड यांचे अजय हे पती आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागात सफाई मजदूर म्हणून लागलेल्या अजय हाथीबेड यांनी प्रभारी जमादार असताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. आरोग्य विभागातील अनेक कर्मचारी महापालिकेत आणि खासगी कंपनीत नोकरी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक सफाई कामगार खासगी ठिकाणी नोकऱ्या करतात. महापालिकेच्या रजिस्टरमध्ये बोगस हजेऱ्या लावून पालिकेकडून पगार उचलला जात आहे. यामध्ये हाथीबेड यांनी पदाचा गैरवापर करीत गैरकारभार करणाऱ्यांना साथ दिल्याचा आरोप किशोर समुंद्रे यांनी केला होता. याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती आता अजय हाथीबेड  यांना निलंबित करण्यात आले.  हाथीबेड व मलवाहक जमादार मुनेश्वर रामटेके या दोघांच्या निलंबनाचे आदेश अपर आयुक्तांनी काढले आहेत.  दरम्यान, आपल्यापर्यंत अद्याप याची माहिती मिळालेली नाही, असे सांगत अजय हाथीबेड यांनी अधिक बोलण्यास नकार दिला़

आपली प्रतिक्रिया द्या