गिरीश बापट यांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशीच भाजप शहराध्यक्षांचे ‘भावी खासदार’ म्हणून झळकले फ्लेक्स

दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे निधन होऊन तीनच दिवस झाले असताना भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार आशयाचे मोठमोठे फ्लेक्स शहरात झळकले आहेत. एकीकडे वाढदिवसानिमित्त नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्याची मुळीक यांनी घोषणा केली. दुसरीकडे भावी खासदारकीच्या फ्लेक्सबाजीमुळे भाजपलाच पोटनिवडणुकीची इतकी घाई झाली आहे का? अशी चर्चा यानिमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा आज (दि. 2) वाढदिवस आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्यासह वाढदिवसाच्या अनुषंगाने नियोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे मुळीक यांनी जाहीर केले. मुळीक यांनी वर्तमानपत्र, टीव्ही चॅनेल्सनादेखील जाहीराती न स्वीकारण्याच्या सूचना केल्या, मात्र बापट यांचे निधन होऊन तीन दिवस होत नाहीत तोच कल्याणी नगर येथे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे फ्लेक्स लागले. त्यामध्ये त्यांचा उल्लेख भावी खासदार असा ठळकपणे केला असल्यामुळे भाजपलाच पोटनिवडणूक आणि खासदारकीची घाई झाली का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

दुसरीकडे काँग्रेस पुणे लोकसभा पोटनिकडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले होते. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे निधन होऊन तीनच दिवस झाले आहेत. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधण्याची गरज नाही. महाराष्ट्राची काही परंपरा आहे की नाही, लोकं म्हणतील यांना जनाची नाही तर मनाची तरी आहे का नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी विजय वडेट्टीवार यांचा पुण्यातच समाचार घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)