घटक पक्षांनी संमती दिल्यानंतरच होणार पदाधिकारी बदल, सांगली जिल्हा परिषद

सांगली जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाच्या जोरदार हालचाली सुरू असून, घटकपक्षांनी संमती दिल्यानंतरच त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. भाजप कोअर कमिटीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

याबाबत सत्ताधारी भाजप आघाडीतील सहकारी पक्ष शिवसेना, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी संवाद साधण्याची जबाबदारी खासदार संजयकाका पाटील आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दोन्ही नेते घटकपक्षांशी चर्चा करणार आहेत.

जिल्हा भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, जि.प.चे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सत्यजित देशमुख, मकरंद देशपांडे, नीता केळकर, सम्राट महाडिक आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले, प्रदेश नेत्यांकडून जिल्हा परिषदेत बदलाबाबतचे आदेश मिळाले आहेत. ते कसे करायचे, यावर बैठकीत चर्चा झाली. त्याआधी या बदलाबाबत सहयोगी घटक पक्ष असलेले शिवसेना, रयत विकास आघाडी, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी विचारविनिमय करण्यात येणार आहे. तसेच, विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा करणार आहोत. जेणेकरून कमी काळासाठी होणारा हा बदल सुटसुटीत पद्धतीने पार पाडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.