स्वपक्षीय नगरसेवकाच्या हत्येसाठी भाजप नगरसेवकाची १ कोटीची सुपारी

कुणाल पाटील (डावीकडे) महेश पाटील (उजवीकडे)

सामना प्रतिनिधी ।कल्याण

पार्टी विथ डिफरन्स असा ढिंढोरा पिटणाऱ्या भाजपचा बुरखा टराटरा फाटला आहे. डोंबिवलीचे भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांची हत्या करण्यासाठी भाजपचेच डोंबिवलीतील गुंड प्रवृत्तीचे नगरसेवक महेश पाटील यांनी एक कोटीची सुपारी दिल्याचे खळबळजनक सत्य पुढे आले आहे. याप्रकरणी महेश पाटील यांच्याविरोधात हत्येचा कट रचल्याचा गुन्हा भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलिसांत दाखल झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी भिवंडी-वाडा परिसरात व्यापाऱ्यांना लुटणारी टोळी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने गजाआड केली होती. या टोळीतील लुटारूंकडून एक पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर, दोन गावठी कट्टे, १६ गोळ्या असा मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला होता. अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या हाती मोठी खबर लागली. डोंबिवलीतील नगरसेवक कुणाल पाटील यांना ठार मारण्यासाठी आम्हाला एक कोटीची सुपारी मिळाल्याची खळबळजनक कबुली या टोळीतील हल्लेखोर विजय मेनबन्सी याने दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवल्यानंतर ही सुपारी भाजपचे दबंग नगरसेवक महेश पाटील यांनीच दिल्याचे तपासात पुढे आले. यानंतर महेश पाटील यांच्यासह त्यांचा निकटवर्ती सुजित नलावडे व अन्य ११ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पाटीलवर १४ गुन्हे
महेश पाटीलवर ठाणे जिह्यातील वेगवेगळ्य़ा सहा पोलीस ठाण्यांत १४ जबरी गुन्हे दाखल आहेत. सशस्त्र हाणामारी, हवेत गोळीबार, खंडणी, खुनाचा प्रयत्न आदी गुह्यांचा यामध्ये समावेश आहे. एका राज्यमंत्र्याच्या दबावामुळेच महेश पाटीलवर कारवाई होत नसल्याची जोरदार चर्चा आहे.

जमिनीचे व्यवहार… आमदारकीचे डोहाळे
कुणाल पाटील हे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे भाजप पुरस्कृत नगरसेवक असून आगामी काळात डोंबिवली शहर आणि डोंबिवली ग्रामीणमधून विधानसभेसाठी ते इच्छुक आहेत. तर महेश पाटील यांनाही आमदार होण्याचे डोहाळे लागले आहेत. याशिवाय कल्याण-डोंबिवलीचा ग्रामीण भाग मोठ्य़ा प्रमाणात विकसित होत आहे. येथील जमिनींना सोन्याच्या भाव आला आहे. हे जमिनीचे व्यवहार आणि आगामी विधानसभा हा धागाच या एक कोटीच्या सुपारीमागे असल्याची उघड चर्चा आहे.

कॉल रेकॉर्ड मॅच
हल्लेखोरांनी सुपारीप्रकरणी महेश पाटील याचे नाव घेतल्यानंतर पोलिसांनी चार दिवस सखोल तपास केला. महेश पाटील यांच्याशी मोबाईलवर हल्लेखोरांनी वेळोवेळी संपर्क साधल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच पोलिसांनी महेश पाटील विरोधात गुन्हा दाखल केला.

आपली प्रतिक्रिया द्या