भाजपाच्या केसरबेन पटेल यांचे नगरसेवकपद रद्द,काँग्रेसचे नितीन सलाग्रे विजयी घोषित

717

मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग क्र. 76 मधून बोगस कागदपत्रांच्या आधारे निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका केसरबेन मुरजी पटेल यांचे नगरसेवकपद मुंबईतील लघुवाद न्यायालयाने आज रद्दबातल ठरविले. तसेच काँग्रेसचे उमेदवार नितीन सलाग्रे  यांना विजयी घोषित केले. लघुवाद न्यायालयाच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांच्या संख्येत एकने वाढ झाली असून मुंबई महापालिकेत काँग्रेसचे संख्याबळ 28 एवढे झाले आहे.

मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 76 मधून भाजपच्या केसरबेन पटेल निवडून आल्या होत्या. वास्तविक हा प्रभाग मागासवर्गीयांसाठी राखीव असतानाही पटेल यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे ही निवडणूक लढविली, परंतु ही बाब जात पडताळणी समितीच्या निदर्शनास आल्याने समितीने ऑगस्ट 2017 मध्ये त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले.

या निर्णयाविरुद्ध केसरबेन पटेल यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली, परंतु या दोन्ही न्यायालयांनी जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचा निर्णय कायम ठेवला. याचदरम्यान काँग्रेस उमेदवार नितीन सलाग्रे यांनी ऍड. चिंतामणी भणगोजी आणि ऍड. विष्णू मदने यांच्यामार्फत लघुवाद न्यायालयात अर्ज करून त्यांना विजयी नगरसेवक घोषित करावे ही मागणी केली. या अर्जाची सुनावणी न्यायाधीश स्वर्णिता महाले यांच्या समोर झाली. दोन्हीकडचा  युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश महाले यांनी नितीन सलाग्रे यांची नगरसेवक पदावरील नियुक्ती जाहीर केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या