शिवसेनेचा दणका… शाई फेकणाऱ्या भाजप नगरसेवकाला अटक

21

पोलिसांची पळापळ

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

शिवसेनेच्या जबरदस्त दणक्यानंतर शहरप्रमुख भाऊ चौधरी यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून शाईफेक केल्याप्रकरणी भाजपचा नगरसेवक महेश पाटील याला त्याच्या तीन साथीदारांसह टिळकनगर पोलिसांनी आज सायंकाळी ४ वाजता अटक केली. या सर्वांना कल्याण न्यायालयात हजर केले असता त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला.

शेतकरी विरोधी वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शहर शिवसेना शाखेतर्फे आंदोलन करण्यात आले. यामुळे भाजपवाले बिथरले. पनवेल महापालिकेचा प्रचार आटोपून शहरप्रमुख भाऊ चौधरी आणि उपशहरप्रमुख प्रकाश तेलगोटे रात्री ९ वाजता त्यांच्या गोग्रासवाडी येथील घराजवळ आले. गाडीतून उतरताच तेथे दबा धरून बसलेल्या भाजप नगरसेवक महेश पाटील, लवू ठाकूर, लक्ष्मण कदम, स्वप्नील जाधव यांच्यासह काही भाजप कार्यकर्त्यांनी भाऊ चौधरी आणि तेलगोटे यांना घेरले. नगरसेवक पाटील यांच्या एका साथीदाराने भाऊ चौधरी यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून शाई फेकली त्यानंतर ते सर्व पळून गेले.

भाजपच्या कार्यालयावर शिवसैनिकांची तुफान दगडफेक

या घटनेनंतर गुरुवारी रात्री प्रचंड तणाव पसरला होता. रात्री उशिरा कल्याण, ठाणे, डोंबिवलीतील शिवसैनिक व पदाधिकारी डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळ जमा झाले आणि त्यांनी उर्सेकरवाडी येथील भाजपच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली. फलकाची तोडफोड करून टाकली. त्यानंतर निषेधाच्या घोषणा देत शिवसैनिक रामनगर पोलीस ठाण्यावर धडकले. भाजप नगरसेवक महेश पाटील याला अटक करा, अन्यथा शनिवारी डोंबिवली बंद करू, असा इशारा देत शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यासमोर चार तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, बालाजी किणीकर, ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी, कविता गावंड, सभापती रमेश म्हात्रे, सभागृहनेते राजेश मोरे, नगरसेवक दिपेश म्हात्रे यावेळी उपस्थित होते. मध्यरात्रीच्या सुमारास पालकमंत्री एकनाथ शिंदे हेही रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी शाईफेक करणाऱ्यांविरोधात कारवाई न केल्यास शिवसेना प्रखर आंदोलन करेल, असा इशारा दिला.

आपली प्रतिक्रिया द्या