भाजप नगरसेवकाची उपायुक्तांना धक्काबुक्की

11

सामना ऑनलाईन, संभाजीनगर ।

तलवारबाजी शिकविणाऱ्या एका संस्थेला कम्युनिटी सेंटर भाडे तत्त्वावर देण्याच्या मुद्यावरून भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे आणि महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र निकम यांच्यात वादावादी व धक्काबुक्की झाली. वादावादीचे हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि वानखेडे-निकम यांच्यातील वाद मिटविला.
महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीनंतर घडलेल्या घटनेबद्दल माहिती देताना राजगौरव वानखेडे म्हणाले, सिडको एन-२ येथील मनपाच्या मालकीचे कम्युनिटी सेंटर तलवारबाजी असोसिएशनला एक हजार रुपये प्रतिमहिना या दराने भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय चार महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत झाला होता. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही. त्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात माझ्याशी संपर्क साधला. असोसिएशनला ते कम्युनिटी सेंटर निर्णय झाल्याप्रमाणे देण्यात यावे, अशी विनंती उपायुक्त रवींद्र निकम यांना फोनवरून केली, पण निकम ऐकण्यास तयार नव्हते. स्थायी समितीची बैठक झाल्यावर निकम यांना सभापती गजानन बारवाल यांच्या दालनात बोलावले. परंतु तेथेही निकम ऐकण्याच्या तयारीत नव्हते. एक हजार रुपयात ते कम्युनिटी सेंटर भाडे तत्त्वावर देणे शक्य नाही, असे निकम म्हणत होते. त्यामुळे त्यांच्याशी वादावादी होऊन धक्काबुक्की झाली. उपस्थितांनी हा वाद सोडवला. वाद सोडविल्यानंतर वानखेडे व निकम परस्परविरोधी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. या ठिकाणी भाजपाच्या शहर जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकारीदेखील पोहचले. त्यांनी मध्यस्थी केल्यावर दोघांमधील वाद मिटला. पोलिसांत तक्रार करण्यात आली नाही. या घटनेमुळे मनपात एकच खळबळ उडाली.

आपली प्रतिक्रिया द्या