भाजप नगरसेवकासह भावाची व दोन मुलांची निर्घृण हत्या, तिघांना अटक

1704

भुसावळ शहरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये भाजप नगरसेवकासह त्यांचे बंधू भाऊ सुनील बाबूराव खरात (55), मुलगा सागर रवींद्र खरात (24), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (20) आणि मोहित गजरे यांचा मृत्यू झाला आहे. या हल्यामध्ये काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

भाजपचे (आठवले गट) नगरसेवक रवींद्र उर्फ हंप्या खरात समता नगर येथे राहतात. त्यांच्यासह कुटुंबावर घरात घुसून मारेकऱ्यांनी बेछूट गोळीबार केला. नंतर चाकू आणि गुप्तीने सपासप वार केले. यात नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. आरपीडी रोडवरील मध्य रेल्वे हॉस्पिटल परिसरातील लाल चर्चसमोर समता नगर भागात रविवारी हा थरार घडला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी गजानन राठोड यांनी आरपीडी रोडवरील लाल चर्च परिसर तसेच खरात यांचे निवासस्थान असलेल्या समतानगरात पाहणी केली. यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनीही भुसावळात घटनास्थळी पाहणी केली.

तिघांना अटक
घटनेच्या तीन तासांनी संशयित आरोपी शेखर मेघे, मोहसीन अजगर खान आणि मयुरेश सुरडकर या तिघांनी जळगाव एलसीबीकडे शरणागती पत्करल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या