संतापजनक! चाळीसगावात भाजप नगरसेवकाकडून छत्रपती शिवरायांचा अवमान, परस्परविरोधी गुन्हे दाखल

3837

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील भाजपचे नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी यांनी त्यांच्या मालकीच्या बांधकामावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेले बॅनर स्वच्छतागृहासाठी वापरल्याचा संतापजनक प्रकार घडला असून याप्रकरणी जाब विचारायला गेलेल्या शिवप्रेमींना मारहाण करण्यात आली. दरम्यान, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी करून गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय ठकूरवाड यांनी दैनिक सामना प्रतिनिधीसोबत बोलताना दिली.

चाळीसगाव येथील राजेंद्र रामदास चौधरी हे भाजपाचे मागील वीस वर्षांहून अधिक काळापासून नगरसेवक आहेत. चाळीसगाव शहराजवळ असलेल्या एका भागात चौधरी यांच्या मालकीच्या जागेवर बांधकाम सुरू आहे. या बांधकामावरील मजुरांना वापरासाठी तात्पुरते स्वच्छतागृह तयार करण्यासाठी बॅनरचा वापर करण्यात आला. या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे. तसेच बॅनरवर खासदार संभाजीराजे भोसले व भाजपचे नेते, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचा फोटो देखील दिसत आहे. भाजपच्या नगरसेवकाकडून स्वच्छतागृहासाठी शिवरायांची प्रतिमा असलेल्या बॅनरचा वापर होणे म्हणजे ही विटंबना व घोर अपमान असल्याचा संताप शिवप्रेमींनी व्यक्त केला आहे. जळगाव जिल्ह्यातील फेसबुक, व्हॉट्सअपसह सोशल मीडियावर याबाबतच्या पोस्ट व्हायरल झाल्या असून शिवप्रेमींनी भाजपा नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान चाळीसगाव येथील अर्जुनसिंग अविनाश पाटील हा युवक चौधरी यांना जाब विचारण्यासाठी गेला होता. त्यानंतर चौधरी यांच्यासह त्यांच्या भावांनी व मुलांनी घरात घुसून अर्जुन पाटील, अविनाश पाटील, मीना पाटील यांच्यासह अन्य एका कुटुंबीयाला तलवारीने हल्ला चढवत मारहाण केल्याचा आरोप पाटील कुटुंबीयांनी केला आहे. तसेच पाटील यांच्या फिर्यादीवरून नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्यासह इतरांविरुद्ध 6 मे रोजी सायंकाळी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर चौधरी यांचे बंधू विजय रामदास चौधरी यांच्या फिर्यादीवरून शिवप्रेमी पाटील कुटुंबातील सदस्य विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दोन्ही गुन्ह्यात सारखे कलम लावण्यात आल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठकुरवाड यांनी दिली आहे. या प्रकरणात अद्यापपर्यंत चौधरी यांना अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा अवमानजनक वापर करून भावना दुखावल्या प्रकरणी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी शिवप्रेमीनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या