पराभवाच्या भीतीने मिंध्यांनी सहकारी संस्थांच्या निवडणुकाही तीन महिने पुढे ढकलल्या

लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि मिंधे सरकारने पराभवाचा धसकाच घेतला आहे. राज्यातील जनतेचा कल आणि पराभवाच्या भीतीने भाजपने राज्यातील 24 हजार 710 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आज घेतला. संशय येऊ नये म्हणून सरकारने पावसामुळे हा निर्णय घेतला गेल्याचा दावा केला आहे.

2024-25 या वर्षात राज्यातील 24 हजार 710 सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित आहेत. त्यापैकी 8 हजार 305 संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी राज्यातील 14 जिह्यांत 100 टक्क्यांपेक्षा, तर पाच जिह्यांत 70 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक शेतकरी, सभासद हे खरीप हंगामातील पेरणीत व्यस्त आहेत. अशा वेळी शेतकरी, सभासदांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पावसाळी हंगाम पूर्ण होईपर्यंत म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था, न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिलेल्या संस्था आणि ज्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन केवळ अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणे बाकी आहे अशा सहकारी संस्थांना त्यातून वगळण्यात आले आहे.