‘स्वाभिमानाचा एक्झिट केव्हाही बरा, राजकारणात काही मिळवण्यासाठी…’, पंकजा मुंडेंच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा

भाजपकडून विधानपरिषदेवर संधी मिळत नसल्याने माजी आमदार पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा अधूनमधून सुरू असतात. याबाबत नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या.

पंकजा मुंडे यांना भाजपकडून विधान परिषद किंवा इतर ठिकाणी का संधी दिली जात नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंकजा यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र याचे उत्तर मी नाही देऊ शकत. मला संधी न देणारे याचे उत्तर देऊ शकतील, असे म्हटले. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहेत.

मी आता ज्या उंचीवर आहे, त्या उंचीवर येणे साध्या लोकांना जमत नाही. ज्या गोष्टी मनात बाळगून मी राजकारणात आलेय. त्या गोष्टी समाजासाठी करण्याची जर मला मुभा नसेल, तर कॉम्प्रोमाइजचे राजकारण करणे मला शक्य नाही. प्रत्येक किलोमीटरवर हायवेवर एक एक्झिट असतो. स्वाभिमानाचा एक्झिट केव्हाही बरा. त्यामुळे राजकारणातून बाहेर पडायची मला भीती वाटत नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

सगळे घाव झेलायला ताई आणि…

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांची बहीण आणि भाजप खासदार प्रितम मुंडे यांनीही एक विधान केले आहे. माझे मोठे भाग्य म्हणजे माझा जन्म पंकजाताईंच्या पाठीवर झाला. कारण सगळे घाव झेलायला ताई आहे आणि त्याची सगळी मलाई खायला मी आहे, असे त्या म्हणाल्या.