कर्जाच्या निमित्ताने फेरीवाल्यांची मते मिळवण्याचा भाजपचा डाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात फेरीवाल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये कर्ज देणार आहेत. त्यानिमित्ताने फेरीवाल्यांची मते मिळवण्याचा हा भाजपाचा डाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हे कर्ज परत मिळण्याची कोणतीही गॅरेंटी नसून जर कर्जाची रक्कम ऑनलाईन दिली जात आहे तर मग फेरीवाल्यांना बीकेसीला का बोलावले जातेय, असा सवालही केला जात आहे.

पंतप्रधान स्वनिधी उपक्रमाअंतर्गत फेरीवाल्यांना हे कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज मिळवण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. फेरीवाल्यांच्या खात्यावर ऑनलाईन दहा हजार रुपये जाणार आहेत. असे असतानाही केवळ त्याचे श्रेय लाटण्यासाठी उद्या फेरीवाल्यांना बीकेसीमध्ये निमंत्रित करण्यात आले आहे. रस्त्यावरच्या या फेरीवाल्यांना कर्ज दिल्यानंतर ते कर्ज फेडू शकतील का? हे कर्ज देताना त्यांच्याकडून फक्त आधार कार्ड, मतदान ओळखपत्र घेतले जात आहे. ज्यांच्याकडे ती कागदपत्रे नाहीत त्यांना स्थानिक महापालिका वॉर्डामधून प्रमाणपत्र आणायला सांगितले जात आहे.

महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या एक लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये कर्ज देण्यासाठी एक हजार कोटी रुपये लागणार आहेत. हे कर्ज फेरीवाल्यांनी फेडले नाही तर ते बुडीत कर्ज ठरणार आहे. म्हणजेच महापालिकेला कर भरणाऱ्या मुंबईकरांच्या पैशांची ही नासाडीच आहे, असा आरोप शिवसेना कांदिवली विधानसभाप्रमुख नीरव बारोट यांनी केला आहे.

बेरोजगारांनाही कर्ज देण्याचे आमिष

फेरीवाल्यांप्रमाणेच पंतप्रधान मोदी हे बेरोजगारांनाही कर्ज देणार आहेत, असे बॅनर भाजपावाल्यांनी मुंबई उपनगरातील मालाड, कांदिवली भागात लावले आहेत. म्हणजेच फेरीवाल्यांबरोबरच बेरोजगारांनाही आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे, असे बारोट यांनी म्हटले आहे.