भाजपची सत्ता असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची दिव्यांगांना अरेरावी

सामना प्रतिनिधी । वसई

दिव्यांगांचा तीन टक्के निधी दिव्यांग व्यक्तींना मिळत नसल्याने ‘अपंग कल्याणकारी संस्थे’ने अर्नाळा ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन आणि एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. भर उन्हात धरणे आंदोलनासाठी बसलेल्या दिव्यांगांना अरेरावी करून भाजपची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मात्र मागण्यांवर ठाम राहिलेल्या दिव्यांगांनी ग्रामपंचायत आवारात संध्याकाळपर्यंत घोषणाबाजी करून हा परिसर दणाणून सोडला.

दिव्यांगांना ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या या सापत्नपणाच्या वागणूकीमुळे दिव्यांगांमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची भावना आहे. गेल्या आर्थिक वर्षाचा दिव्यांगांचा तीन टक्के निधी ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे सरकारला परत गेला होता. ग्रामपंचायतीची नवीन इमारत बनवताना दिव्यांग व्यक्तींसाठी सोयी नसल्याने दिव्यांगांना दैनंदिन कामानिमित्त येथे जाताना त्रास सहन करावा लागतो. तीन टक्के निधी वाटपासह विविध मागण्यांसाठी ‘अपंग कल्याणकारी संस्थे’ने वारंवार पाठपुरावा केला असून त्याला ग्रामविकास अधिकारी आणि सदस्यांनी आश्वासनांचे गाजर दाखवत असहकार्य केल्याने दुर्दैवाने दिव्यांगांना तीव्र आंदोलन करावे लागले, असे ‘अपंग कल्याणकारी संस्थे’चे अध्यक्ष शमीम खान यांनी सांगितले. या आंदोलनात संस्थेचे संघटक भरत पाटील, कायदेतज्ज्ञ स्टीफन डिमेलो, राष्ट्रीय बहुजन विकास संघटनेचे अध्यक्ष शरद तिगोटे, शरद गायकर, अंकुश खारकांडी, नरेश पाटील, विशाल कुडू, सुचित्रा दाभोलकर सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या