भाजप आमदाराची म्हैस हरवली अन पोलीस फौज कामाला जुंपली

86

सामना ऑनलाईन । सितापूर

उत्तर प्रदेशमधून विधानसभेचे सदस्य असलेले भाजप नेते सुरेश राही यांच्या दोन म्हशी चोरी झाल्या आहेत. याप्रकरणी  त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून संपूर्ण पोलीस फौज म्हशी शोधण्याच्या कामाला लागली आहे. याआधी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांची म्हैस चोरी गेल्यानंतर संपूर्ण पोलीस फौज कामाला लागली होती तेव्हा भाजपाने चौफेर टीका केली होती. मात्र आता स्वपक्षाच्याच नेत्याच्या चोरी झालेल्या म्हशी शोधण्यासाठी पोलीस कामाला लावल्याने विरोधकांनी आणि नेटकऱ्यांनी हल्लाबोल केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

सितापूर जिल्ह्यातील हरगावमध्ये राहणारे भाजप नेते सुरेश राही यांच्या एक लाख रुपये किंमतीच्या दोन म्हशी चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ म्हशींची शोधमोहीम सुरू केली. मात्र उत्तर प्रदेशमधील वाढत्या गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्याऐवजी नेत्यांच्या म्हशी धुंडाळण्यात धन्यता मानणाऱ्या पोलिसांवर आणि भाजपावर नेटकरी तुटून पडले आहेत.

याप्रकरणी सीबीआय चौकशी केली जावी, असे एका युझरने लिहिले आहे. तर एकाने आझम खान यांची म्हैस चोरी गेल्यानंतर मोदी आणि कंपनीने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते, मात्र आता स्वपक्षाच्या नेत्यानेच तसे केल्याने त्यांच्या तोंडावर चिकटपट्टी लागली आहे असे म्हटले आहे. काही जणांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याच्यावर हाच का तुमचा विकास. बदल कुठे आहे, अशा प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या