भाजपला गुंडांचं याड लागलं

सामना ऑनलाईन,ठाणे

सैराट’ सिनेमात परशाला जसं आर्चीचं याड लागलं तसंच भाजपला गुंडांचं याड लागलं आहे. त्यामुळेच राज्यातील राजकारण सैराट झालं आहे, अशी टीका उपनेत्या-आमदार डॉ. नीलम गोऱहे यांनी केली.

येथील प्रभाग क्र. 20 मध्ये शिवसेना उमेदवार मालती पाटील, शर्मिला पिंपळोलकर, नम्रता पमनानी, गिरीश राजे आणि प्रभाग क्र. 17 मध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रकाश शिंदे, एकता भोईर, संध्या मोरे, योगेश जानकर यांच्या प्रचारासाठी प्रचंड गर्दीच्या सभा झाल्या. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते.

ठाणे हे सुरक्षित शहर आहे ते केवळ शिवसेनेमुळेच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी ठाणेकरांच्या हाती दिलेला भगवा झेंडा पुन्हा एकदा महापालिकेवर फडकवून शिवसेनेची एकहाती सत्ता आणा असे आवाहन गोऱहे यांनी केले. ज्या महिलांवर कौटुंबिक अत्याचार केले जातात त्या महिलांना शिवसेनाच न्याय देते. शिवसेनेच्या शाखा महिलांसाठी माहेर, सासरच आहेत. म्हणून सुरक्षित ठाण्यासाठी भगव्याचाच आवाज घुमू द्या असे सांगतानाच शिवसेनेने ठाण्यासाठी केलेल्या विकासकामांची जंत्री मांडली तर एक मोठा ग्रंथ तयार होईल असेही त्या म्हणाल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आणलेल्या विकासाच्या झंझावातालाच ठाणेकर मत देतील असा विश्वासही गोऱहे यांनी व्यक्त केला.

जे बोललो ते करतोच शिंदे

ठाणेकरांचा विश्वास हीच आमची पुंजी आहे म्हणून ठाणेकरांच्या विकासासाठी आम्ही जे बोलतो ते करून दाखवतोच, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणेकरांना 500 फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून मुक्त करणार, ठाणेकरांसाठी 30 एकर जागेवर भव्य सेंट्रल पार्क आणि वाहतूककोंडीमुक्त ठाणे करण्यासाठी जलवाहतूक प्रकल्प राबवणारच अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. यावेळी व्यासपीठावर शहरप्रमुख रमेश वैती, माजी नगरसेवक कृष्णकुमार कोळी, महिला विभाग संघटक ज्योती कोळी, ऍड. जयेश वाणी, भारतीय विद्यार्थी सेना प्रदेश सदस्य राहुल लोंढे, योगेश गाढवे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या