भाजपा भय आणि भ्रष्टाचाराचा पक्ष, नाना पटोले यांचा घणाघात

भाजपा हा भय आणि भ्रष्टाचाराचा पक्ष आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर केला.

नाशिक येथे ओबीसी व बाराबलुतेदारांच्या उत्तर महाराष्ट्र मंथन शिबिरासाठी ते आले होते, त्याप्रसंगी रविवारी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपाने नेहमीच ओबीसींवर अन्याय केला. राज्यात भाजपाप्रणित ईडी सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली, असेही ते म्हणाले.

ओबीसींसाठी संख्येच्या आधारावर आर्थिक व सामाजिक धोरण ठरवावे, अशी मागणी त्यांनी केली. राज्य सरकारनेच वेदांत प्रकल्प गुजरातमध्ये पळविला, तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नको ते खुलासे करीत आहेत. या सरकारला महाराष्ट्रापेक्षा गुजरातचा जास्त पुळका आहे. उद्या मुंबई गुजरातमध्ये गेली तर आश्चर्य वाटायला नको, असा टोला पटोले यांनी भाजपाला हाणला. देशातील सर्वात कमजोर पक्ष हा भाजपा आहे. भय आणि भ्रष्टाचाराचा पक्ष आहे. विरोधकांना भय दाखवून भ्रष्टाचार करणारा पक्ष म्हणजे भाजपा, अशी टीकाही त्यांनी केली.