‘त्या’ वक्तव्यासाठी आमदार गोटेंना कारणे दाखवा नोटीस

सामना ऑनलाईन । मुंबई

भाजप आमदार अनिल गोटे यांना पक्षाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. विधानपरिषद बरखास्त करावी अशी सरकारची भूमिका नसताना वारंवार विधानपरिषद बरखास्तीची मागणी केल्याप्रकरणी गोटे यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. आमदार गोटे यांना तीन दिवसांत स्पष्टीकरण दिले नाही तर कारवाई होईल असेही बजावण्यात आले आहे.

आमदार गोटे यांनी विधानसभेत बोलताना, विधानपरिषद बरखास्त करा असे वक्तव्य केले होते. सत्ताधारी पक्षातील एका आमदाराने केलेल्या वक्तव्याचे विधानपरिषदेत तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी सरकारला गोटे यांच्या वक्तव्याप्रकरणी जाब विचारला. आमदार गोटे यांचे वक्तव्य कामकाजातून काढले असले तरी सत्ताधारी पक्षाला विधान परिषद नको आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

गोटे यांच्या वक्तव्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी जोरदार टीका केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गोटे यांचे वक्तव्य सभागृहाच्या उंचीला न शोभणारे असल्याचे सांगत आपली नाराजी प्रकट केली. गोटे यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. संविधानाच्या चौकटीत सभागृह तयार झालं आहे. विधानपरिषद हे वरिष्ठांचे सभागृह आहे; असे सांगत विधानपरिषद बरखास्त करण्याची सरकारची भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या