बिहारमध्ये भाजप-जेडीयूत तणाव? पाठिंबा काढण्याच्या धमकीवर जेडीयूनं दिलं आव्हान

63
jdu-bjp

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारमध्ये भाजप-जेडीयू युतीत दिवसेंदिवस तणाव वाढत जात असल्यासारखे वातावरण आहे. सत्तेत सोबत असून देखील एकमेकांना इशारे, आव्हान देण्याचे काम जेडीयूकडून सुरू असून पक्षाचे सरचटणीस आणि माजी खासदार यांनी भाजपला एकटं लढून दाखवण्याचं खुलं आव्हान दिलं आहे. ‘भाजपचे काही नेते बिहारमधील जेडीयूला दिलेलं समर्थन मागे घेण्याची धमकी देत आहे. इतकंच असेल तर त्यांनी एकदा एकट्यानं निवडणूक लढली पाहिजे. निवडणुकीच्या निकालाने त्यांना समज येईल’, असे पवन वर्मा म्हणाले.

‘बिहारमध्ये युतीचे सरकार असताना अशा प्रकारचा व्यवहार, अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही’, असेही वर्मा यांनी यावेळी स्पष्ट बोलून दाखवले. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सच्चिदानंद राय यांनी शनिवारी नितीशकुमार यांच्या सरकारवर कडाडून टीका केली होती आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे युतीसंदर्भात विनाविलंब निर्णय घेण्यात यावा अशी विनंती केल्याचे सांगितले होते.

पुढल्यावर्षी बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी युतीच्या दोन्ही पक्षांत कटूपणा वाढत चालला आहे. महत्वाची बाब म्हणजे जेडीयूने केंद्रातील मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावेळी भाजपला स्थान दिले नव्हते. त्यामुळे दोन्ही पक्षांतील कटूता स्पष्ट दिसू लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या