राहुल गांधी यांच्या गाडीवर दडफेक केल्याप्रकरणी भाजपच्या नेत्याला अटक

26

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या पालनपूर युवा शाखेचे सरचिटणीस जयेश दर्जी यांना अटक केली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) धनेरा कृषी उत्पादन बाजार समितीचे अध्यक्ष भगवानभाई पटेल यांच्यासह ३ जणांची नावं आहेत.

गुजरातमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राहुल गांधी बनासकांठा जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांच्या गाडीवर शुक्रवारी दगडफेक करण्यात आली होती. दगडफेकीत गाडीची काच फुटली होती. या प्रकरणी चौकशीअंती पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतली. धनेरा येथे कृषी उत्पादन बाजार समितीच्या मैदानात राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली होती. नंतर दगडफेकीची घटना घडली होती. राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.

दगडफेक प्रकरणी एफआयआर दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. मात्र गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांच्यासह राज्यातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अखेर जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी एकमेकांशी चर्चा केली आणि एफआयआर दाखल करण्याचा निर्णय झाला. दरम्यान, गुजरातसह देशात अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्यावर झालेल्या दगडफेकीचा निषेध केला.

राहुल गांधी यांनी त्यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीसाठी भाजपला जबाबदार ठरवत थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ला केला. मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कट रचून दगडफेक केली, अशा स्वरुपाचा आरोप राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधानांनी राहुल गांधी यांच्यावर झालेल्या दगडफेकीप्रकरणी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. या संदर्भात बोलताना ‘ज्यांनी दगडफेक करण्याचा आदेश दिला तेच त्या कृत्याचा निषेध कसा करतील?’, असे राहुल गांधी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या