लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, भाजप नेता अटकेत

39
crime women

सामना ऑनलाईन । गडचिरोली

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील भाजपचे नेते अजय येगांती यांना एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. येगांती आदिवासी विकास मंत्री राजे अंबीशराव आत्राम यांची निकटवर्तीय आहेत. येगांती यांची आई शकुंतला चालवत असलेल्या वसतिगृहात पीडित मुलगी राहत होती.

पीडित मुलीच्या आई वडिलांनी ती लहान असतानाच तिचे एका इसमाशी लग्न लावून दिले होते. सासरी तिचा अतोनात छळ करण्यात येत होता. यामुळे मुलगी सासर सोडून माहेरी आली. पण तिच्या आई वडिलांनी तिचा सांभाळ करण्यास नकार देत तिला हाकलून दिले होते. यामुळे तिने येगांती यांच्या आईच्या वसतिगृहात आश्रय घेतला होता. या वसतिगृहात येगांती वरचेवर येत असत.

याच दरम्यान पीडित मुलगी व येगांती यांच्यात मैत्री झाली. येगांती यांनी मुलीला लग्नाचे आमिष दाखवले व वसतिगृहातच तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. याला कंटाळून मुलीने अनेकवेळा वसतिगृहात पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकवेळी तिला अपयश आले. शेवटी तिच्या प्रयत्नांना यश मिळाले व ती वसतिगृहातून पळून थेट जिल्हा बाल कल्याण समितीच्या कार्यालयात पोहचली. त्यानंतर जिल्हा बाल कल्याण समितीने येगांती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. येगांती यांच्याविरोधात भादंवि कलम ३७६ आणि २०१२ (POCSO) च्या कलम ९ व १० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या