महाराष्ट्रातील माणूस गुन्हे करत नाही का? भाजपने केली परप्रांतीयांची अशीही ‘नोंद’

साकीनाका प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतर राज्यांतून येणाऱ्य़ांची नोंद ठेवण्याची सूचना पोलीसांना दिल्या आहेत. मात्र, परप्रांतीयांच्या नोंदणीच्या मुद्दय़ावरून भाजप नेत्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर महाराष्ट्रातील माणूस असे गुन्हे करत नाही का?, अशी विचारणा करत आदळआपट सुरू केली आहे.

महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये. इतर राज्यातून येणाऱ्य़ांची नोंद ठेवणे आवश्यक असून ते येतात कुठून, जातात कुठे यांची माहिती ठेवण्याच्या सूचना गृह विभागाच्या आढावा बैठकीत पोलिसांना देण्यात आल्या आहेत. महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या या सूचनेवरून राजकारण करत भाजप नेत्यांनी परप्रांतीय विरुद्ध स्थानिक असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘परप्रांतीयच अशा प्रकारचे गुन्हे करतात का? महाराष्ट्रातील माणूस करत नाही का? असं एखाद्या समाजाला टार्गेट करण्यात अर्थ नसल्याच म्हटले आहे. तर आमदार अतुल भातखळकर यांनी परप्रांतीयांची नोंद ठेवण्याच्या मुद्दय़ावरून संताप व्यक्त केला आहे. असं करणं म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्यासारखे असल्याचे सांगत कांदिवली समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काय आहेत मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुख्यमंत्र्यांनी महिला सुरक्षेशी संबंधित अनेक महत्वाच्या सूचना पोलिसांना केल्या. अशा प्रकारच्या गुह्यांमध्ये ऑटो रिक्षांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंद करण्यात यावी. तसेच, स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करण्यात यावे.  इतर राज्यातून येणाऱ्य़ांची नोंद ठेवणे आवश्यक असून ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी.

आपली प्रतिक्रिया द्या