कर नाही त्याला डर कशाला? पण नील किरीट सोमय्या यांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव

भाजपचे किरीट सोमय्या सत्ताधारी पक्षावर सातत्याने आरोपांची राळ उठवतात. मात्र किरीट व त्यांचा मुलगा नील याचे पीएमसी घोटाळय़ातील आरोपी राकेश वाधवान याच्याशी असलेले हितसंबंध अंगाशी येऊ नयेत म्हणून सोमय्या आतापासूनच फिल्डिंग लावत आहेत. कोणताही गुन्हा दाखल झालेला नसतानाही किरीट यांचे पुत्र नील याने अटकपूर्व जामिनासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर 72 तासांपर्यंत पोलिसांनी कारवाई करू नये अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. या याचिकेवर सोमवार, 28 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी गेल्याच आठवडय़ात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील यांच्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड केला. या पिता – पुत्राचे पीएमसी बँक घोटाळय़ाचा आरोपी राकेश वाधवान याच्याशी असलेले आर्थिक  हितसंबंध, निकॉन इन्फ्रा कंपनीचा संचालक नील सोमय्या याच्या कंपनीत वाधवानची असलेली भागीदारी याची कुंडलीच खासदार राऊत यांनी मांडली. त्यामुळे सैरभैर झालेल्या किरीट सोमय्या यांनी आरोप फेटाळून लावत आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. मात्र राऊत यांच्या या दाव्यात काहीच तथ्य नसून भ्रष्टाचार प्रकरणात पुत्र नील सोमय्या अडचणीत येऊ नये म्हणून सोमय्यांनी हातपाय मारायला सुरुवात केली आहे. नील यांच्या विरोधात कोणताही एफआयआर दाखल झाला नसताना त्यानी अटकपूर्व जामिनासाठी अॅड. ऋषिकेश मुंदर्गी यांच्यामार्फत मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायाधीश उपस्थित नसल्याने आज या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे नील सोमय्या याच्या अर्जावर आता सोमवार, 28 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

भ्रष्टाचार प्रकरणात पुत्र नील सोमय्या अडचणीत येऊ नये म्हणून किरीट सोमय्यांनी हातपाय मारायला सुरुवात केली आहे. नील यांच्या विरोधात कोणताही एफआयआर दाखल झाला नसताना त्यानी अटकपूर्व जामिनासाठी अॅड. ऋषिकेश मुंदरगी यांच्यामार्फत मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.