नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार यांचे नाव निश्चिंत

32

सामना ऑनलाईन । नागपूर

नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका नंदा जिचकार यांचे नाव निश्‍चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण – पश्‍चिम मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३७ मधून नंदा जिचकार निवडून आल्या आहेत.

नागपूरमध्ये भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आल्याने पक्षाला दोन तृतीयांश बहुमत आहे. या स्थितीमध्ये महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. भाजपने पक्षात वरिष्ठ व उच्च शिक्षित असलेल्या नंदा जिचकार यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या शहराची सूत्रे दिली आहेत.

नंदा जिचकार यापूर्वी २००२ मध्ये शहरातून सर्वाधिक मताधिक्‍यांनी विजयी झाल्या होत्या. त्यानंतर २००७  व २०१२ ची महापालिका निवडणूक त्यांनी लढविली नव्हती. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर नागपूर शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. ही जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पार पाडली. त्यामुळे यावर्षी त्यांनी प्रभाग क्रमांक ३७ मधून उमेदवारी देण्यात आली. याच प्रभागातून कॉंग्रेसचे शहराध्यक्ष व विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी निवडणूक लढविली होती. ठाकरे यांना पराभूत करण्यासाठी जिचकार यांच्या संबंधांचा या प्रभागात फायदा झाला. त्याची “बिदागी’ जिचकार यांना मिळाल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेतील राजकारणावर आता मुख्यमंत्र्यांची उघडपणे मोहोर दिसू येऊ लागली आहे. महापौरपद नंदा जिचकार व सत्तारुढ पक्षनेतेपद संदीप जोशी यांना मिळाले. हे दोघेही मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद संदीप जाधव यांना दिले जाणार आहे. ते पश्‍चिम नागपूर मतदारसंघातील प्रभागातून निवडून आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या