केंद्रातील मोदी सरकारला भाजपचेच ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी घरचा आहेर दिला आहे. सोनम वांगचुक यांना करण्यात आलेल्या अटकेवर स्वामी यांनी जोरदार टीका केली आहे. ‘सोनम वांगचुक यांना केलेली अटक हा मोदी सरकारचा मूर्खपणा आहे. मी आणि देशाचे इतर नागरिक सर्वजण सोनम यांच्या तत्काळ सुटकेची मागणी करतो, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. त्याबाबतची एक पोस्ट त्यांनी एक्स वर शेअर केली आहे.
शिक्षणतज्ञ, पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह 130 जणांना ‘दिल्ली चलो पदयात्रा’ दरम्यान दिल्ली पोलिसांनी सिंधू बॉर्डरवरून अटक करण्यात आली. वांगचुक हे लडाखहून दिल्लीत आंदोलनासाठी येत होते. हरियाणातून दिल्लीत दाखल होताच पोलिसांनी त्यांना अटक केली. वांगचुक यांच्या अटकेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
सोनम वांगचुक यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक म्हणजे लडाखचा राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करणे, स्थानिक लोकांना त्यांची जमीन आणि सांस्कृतिक अस्मितेचे रक्षण करण्यासाठी कायदे करण्याचे अधिकार देणे. याशिवाय ते लडाखला राज्याचा दर्जा आणि पर्यावरणीय सुरक्षेची मागणी करत आहेत. या मागण्यांसाठी त्यांनी लेहमध्ये नऊ दिवस उपोषणही केले होते. त्यानंतर लडाखमधील पर्यावरण आणि स्थानिक लोकांचे संरक्षण याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यावर त्यांचा भर होता.