एअर इंडिया विक्रीचा निर्णय राष्ट्रविरोधी! भाजप खासदाराचा न्यायालयात जाण्याचा इशारा

1149

केंद्र सरकारने कर्जाच्या बोझ्याखाली दबलेली एअर इंडिया विक्रीस काढली आहे. सरकारने सोमवारी याबाबतचे प्रस्ताव जारी केले आहे. निर्गुंतवणुकीच्या धोरणानुसार केंद्र सरकार एअर इंडियातील 100 टक्के भागीदारी विक्रीस काढणार आहे. मात्र, एअर इंडिया विक्रीचा निर्णय राष्ट्रविरोधी आहे. या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचे भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून स्वामी यांनी सोमवारी सरकारला इशारा दिला आहे.

सरकारने एअर इंडिया कंपनी विक्रीसाठी खरेदीदारांकडून प्रस्ताव मागवले आहेत. खरेदीसाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी 17 मार्च 2020 पर्यंतची मुदत आहे. त्याचबरोबर सरकारने एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअरपोर्ट सर्व्हिस कंपनी या दोन सरकारी अनुदानित कंपन्याचे 50 टक्के भागीदारी विक्रीचे प्रस्ताव मागवले आहेत. सरकारच्या या घोषणेनंतर सुब्रमण्यं स्वामी यांनी सरकारवर टीका केली आहे. एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. हा नर्णय राष्ट्रविरोधी असून आपण आपल्या अनमोल रत्नांची विक्री करू शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे. तसेच सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही स्वामी यांनी दिला आहे. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावरही त्याचे परिणाम दिसून आले. अनेकांनी स्वामी यांच्यावर टीका केली आहे. कर्जाच्या बोज्याखाली असणाऱ्या कंपनीवर जनतेचा पैसा का खर्च करावा, असे काहीजणांचे म्हणणे आहे. तर काहीजणांनी स्वामी यांची भूमिका योग्य असल्याचे सांगत एअर इंडिया वाचवण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत असे म्हटले आहे.

सरकारने एअर इंडियातील 100 टक्के समभाग विक्रीस काढले आहेत. गेल्या वर्षी सरकारने 76 टक्के समभाग विक्रीसाठी प्रस्ताव मागवले होते. मात्र, तेव्हा सरकारला एकही खरेदीदार मिळाला नाही. त्यामुळे लिलाव प्रक्रिया अपयशी ठरली होती. त्यावर एक अहवाल मागवण्यात आला होता. त्या अहवालानुसार अटींमध्ये बदल करण्यात आले आणि आता पुन्हा विक्रीसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या