माझ्या पत्नीला मत द्या… भाजप नेत्याची मुस्लिम मतदारांना धमकी

66
सामना ऑनलाईन। लखनौ

सध्या सोशल साईटवर एका व्हिडिओने खळबळ उडवून टाकली आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील भाजपच्या एका नेत्याचा आहे. रंजीत बहादुर श्रीवास्तव असे त्याचे नाव असून माझ्या पत्नीला मत नाही दिलेत तर याद राखा गाठ आमच्याशी आहे. तुमची मदत करायला कोणताही पक्ष पुढे येणार नाही. कारण सरकार भाजपचं आहे, अशी धमकीवजा सूचनाच ते मतदारांना देत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

एका हिंदी वृत्तपत्रानं यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने येथे प्रचाराची धूम सुरू आहे. या वातावरणात मुस्लिम मतदारांना धमकी देतानाचा भाजप नेत्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ मंगळवारचा असून लखनौला लागूनच असलेल्या बाराबांकी जिल्हयातील आहे. व्हिडिओत श्रीवास्तव एका व्यासपीठावर भाषण करत असल्याचे दिसत आहे. त्यांची पत्नी शशी श्रीवास्तव बाराबांकीत भाजपच्या अध्यक्ष पदाची उमेदवार आहे. यामुळे तिलाच प्रचंड मतांनी जिंकून द्या नाहीतर परिणामांना सामोरे जाण्याची धमकी श्रीवास्तव देत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

या व्हिडिओत श्रीवास्तव नागरिकांना उद्देशून भाषण करत आहेत. मी तुमच्याकडे भीक मागत नाही. तुमचं मत भाजपलाच द्या नाहीतर भाजप सरकारच्या राज्यात तुम्हाला नाहक अनेक त्रासांना सामोरं जावं लागेल. तुमची मदत करायला कोणीही पुढे येणार नाही. आता काही समाजवादी पक्षाचं सरकार नाही यामुळे मुस्लिमांनो विचार करा. जर यावेळी रंजीत बहादुरच्या पत्नीला मत नाही दिलंत तर याचे इतके भयानक गंभीर परिणाम होतील ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचारही केला नसेल, असेही ते बोलत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
आपली प्रतिक्रिया द्या