भाजप नेत्याच्या मुलीवर बलात्कार करून डोळे फोडले, ठार मारल्यावर मृतदेह झाडाला टांगला

rape
प्रातिनिधिक फोटो

झारखंडच्या पलामूमध्ये एक हादरवणारी घटना घडली आहे. इथल्या भाजप नेत्याच्या मुलीवर बलात्कार करून तिचा हिंस्त्र पद्धतीने खून करण्यात आला आहे. या मुलीचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत मिळाला आहे. ही मुलगी 16 वर्षांची होती. या मुलीचा खून करण्यापूर्वी तिचे डोळे फोडण्यात आले होते. मुलीचा मृतदेह पाहून पोलीसही हादरले आहेत. मुलीने आत्महत्या केली असं दाखवण्यासाठी तिला झाडाला टांगण्यात आलं होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पनकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुधबार गावात ही मुलगी राहात होती. ही मुलगी 10वी त शिकत होती आणि 7 जूनपासून ती बेपत्ता झाली होती. मुलगी घरी परत न आल्याने तिच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता त्यांना लालमाटी जंगलात मुलीचा मृतदेह सापडला होता. बुधवारी या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडिता ही भाजपच्या स्थानिक नेत्याची मुलगी होती. पोलिसांना घटनास्थळी एक मोबाईल सापडला आहे. या मोबाईलच्या कॉल डेटा रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी, प्रदीप कुमार सिंह धनूक (23 वर्षे) नावाच्या आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा विवाहीत असून त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मुलीवर बलात्कार केला असावा असा पोलिसांना संशय आहे. हत्येपूर्वी या मुलीला बेदम मारहाण करण्यात आली होती आणि तिचा डावा डोळा खोबणीतून उचकटून बाहेर काढला होता.

आपली प्रतिक्रिया द्या